
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी आजपर्यंत कोरोनाच्या संकटात देखील १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असून मागील अनेक वर्षापासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.
मागील काही वर्षात कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून निधी आणला आहे.या निधीतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रभाग क्र. ६ मधील पुतळ्याचे सुशोभिकरण करणे, प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करून उद्यान विकसित करणे, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे, कोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे,प्रभाग क्रमांक १ मधील खडकी येथील खरे घराजवळील नाल्यावर सीडी वर्क करणे, खैरनार घराजवळ सीडी वर्क करणे, खडकी ते मदरसा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २ मधील संदीप शिरोडे घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपरिषद हद्दीतील लुंबिनी बुद्धविहारकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ मधील नगर मनमाड हाय वे ते साईधाम मार्ग डांबरीकरण करणे, एस. एस. जी.एम. कॉलेज समोरील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ६ मधील आचारी हॉस्पिटल ते छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ६ मधील पंचायत समिती ते आठरे बंगला रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ९ मधील छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल ते धरणगाव रोड नागरे पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ख्रिश्चन समाजाच्या प्रभाग क्र.८ मधील ख्रिश्चन दफन भूमी मध्ये संरक्षण भिंत व सोयी सुविधा करणे , आदी विकासकामांचा सामावेश आहे. या विकासकामांना येत्या काही दिवसात प्रारंभ होणार असून हि कामे लवकरात लवकर पूर्ण देखील होणार असून आजपर्यंत शहरवासियांनी सोसलेला त्रास यापुढे आ. आशुतोष काळे यांच्यामुळे नक्कीच कमी होणार आहे. त्याचबरोबर धारणगाव रस्त्याच्या कामाच्या देखील निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असून नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांचा देखील आ. आशुतोष काळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्यामुळे कोपरगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.
