Uncategorized

कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांना भारतीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे मानद सदस्यत्व…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांना भारतीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे (ISSLUP) सन 2026 साठी मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे. संस्थेसाठी त्यांनी दिलेले असाधारण योगदान आणि मौल्यवान मार्गदर्शन यांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. मृदा विज्ञान, भूमी संसाधन व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन आणि समस्याग्रस्त जमिनींची सुधारणा या क्षेत्रांत डॉ. खर्चे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मृदेचे आरोग्य जपणे, पिकांची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करणे यांसाठी त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील चोपण जमिनींच्या सुधारणेसाठी त्यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले आहे.
सुमारे तीन दशकांच्या शैक्षणिक व संशोधन कारकिर्दीत त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. संशोधन संचालक म्हणून 57 सुधारित पीक वाण, 50 कृषि अवजारे आणि 443 उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशी इत्यादींच्या विकास व प्रसाराला त्यांनी चालना दिली. त्यांनी 24 पदव्युत्तर व 10 आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. पीक विविधीकरण, हवामान अनुकूल शेती आणि तंत्रज्ञानाचा शेतकरी स्तरावर विस्तार यांसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. खर्चे यांच्या कार्याचा यापूर्वी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव झाला आहे. आयएसएसएलयूपीचे मानद सदस्यत्व हा त्यांच्या संशोधन कार्याचा आणि संस्थेला दिलेल्या मार्गदर्शनाचा आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या सर्व स्तरांमधून कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *