Uncategorized

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करणार :- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या आर्थिक अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाचा ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने घेतला आहे. संकटाच्या काळात उत्सवातील भव्यतेपेक्षा सामाजिक जाणीव आणि परिस्थितीचे भान महत्त्वाचे असल्याची भूमिका घेत, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोषदादा काळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा हा नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका तथा मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली.
दरवर्षी कोपरगावातील हजारो महिला भगिनी ज्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, तो उत्सव यंदा रविवार (दि.११) ते सोमवार (दि.१९) या कालावधीत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. यंदा दुष्काळामुळे शेती आणि शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले असून, त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरही होत आहेत. अशा परिस्थितीत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेच्या अडचणींची जाणीव ठेवून नवरात्रोत्सवातील काही कार्यक्रमात कपात करण्यात आली आहे. मात्र, धार्मिक परंपरा आणि महिला भगिनींच्या उत्साहात खंड पडू न देता देवीची आराधना आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या नऊ दिवसांत कुंकुमार्चन, देवीचे पाठ आणि भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, मेहंदी, देवी अलंकार, देवी तिलक तसेच नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करतानाच धार्मिक श्रद्धा, महिला एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात कोपरगाव शहर व परिसरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *