ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई,नाशिक):- सिन्नर भुषण ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी असलेले ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. राज्यभरात त्यांचा भक्त परिवार होता. त्यांनी राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविली. धार्मिक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सिन्नर भुषण पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील वारकरी संप्रदायाची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *