
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज बंद करू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने सोमवार (दि.११) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु कोपरगाव शहरात बंद न पाळता कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी दिली आहे.
लखीमपुर येथील शेतकरी काळे झेंडे दाखवून शांततापुर्वक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर अमानुषपणे गाडी घालून अनेक शेतकऱ्यांचा जीव घेतला असून शेतकऱ्यांचा जीव घेणारा गुन्हेगार अद्याप मोकाट फिरत आहे. या मंत्रीपुत्रावर केंद्रातील भाजप सरकारने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवार (दि.११) रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. परंतु कोपरगाव शहरातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून कोपरगाव शहर बंद ठेवता आम्ही देखील काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करू मात्र कोपरगाव शहर बंद ठेवू नये अशी विनंती केली होती.
सोमवार (दि.११) रोजी कोपरगावचा आठवडे बाजार असून दसऱ्याच्या सणाचा हा बाजार आहे. जर सोमवारी कोपरगाव शहर बंद ठेवण्यात आले तर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार असून ग्रामीण भागातून दर सोमवारी कोपरगावला बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील मोठी गैरसोय होणार आहे. सोमवारी जरी कोपरगाव शहर बंद नसले तरी केंद्र शासनाचा निषेध म्हणून सर्व व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करतील अशी ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटातून कुठतरी बाजारपेठ सावरत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांबरोबर व्यापारी वर्गाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याची जाणीव ठेवून कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोपरगाव शहरात सोमवार (दि.११) रोजी बंद पाळण्याऐवजी व्यापारी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी सांगितले आहे.
