Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठात सेंद्रिय व नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाळा संपन्न…

नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणाऱ्या शेतीपध्दतींना प्राधान्य देणे गरजेचे:- कुलगुरु डॉ. विलास खर्चे…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
सध्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धतीचा पुनर्विचार करून शास्त्रीय दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा. मातीचा एक सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकविणे आणि तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन व सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला पशुधनाचीही जोड देणे आवश्यक आहे. जमिनीचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणाऱ्या शेतीपद्धतींना प्राधान्य देणे आवश्यक ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभागांतर्गत असलेल्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत सेंद्रिय व नैसर्गिक शेती या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे व अन्नशास्त्र, तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करतांना म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांनी स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार आणि प्रचार करावा. कृषि विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेती या विषयावरील होत असलेले संशोधन, त्याचे निष्कर्ष गावोगावी पोहचणे गरजेचे आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसंबंधी विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अशोक जगताप, श्रावणी कोपनी व हसीना गावीत या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उर्मिला पाडवी, अशोक जगताप व प्रकाश पाटील या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैष्णवी खरबडकर यांनी केले. या प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापुर आणि अक्कलकुवा या तालुक्यातील 31 महिला महिला शेतकरी व 29 शेतकरी असे एकुण 60 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *