कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. रुग्ण जरी मोठया प्रमाणावर निष्पन्न होत असले तरी आरोग्य विभागाला येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. माझा मतदार संघ हेच माझे कुटुंब आहे. प्रत्येक बाधित रुग्ण हे फक्त माझ्या मतदार संघातीलच नाही तर ते माझ्या परिवारातील सदस्य आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेत कमतरता आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिला. शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात आला असून या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याचा संभव आहे. त्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या करावयाच्या उपाय योजनांची पूर्व तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होती मात्र ही लाट जेष्ठ नागरिकांसाठी जीवघेणी ठरली. दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असून २० ते ५० वयोगटातील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही या लाटेची तीव्रता कायम आहे. अशा परिस्थितीत शासनाने तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला असून या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने अजिबात गाफील राहून चालणार नाही अशा सूचना दिल्या. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शासनाच्या सूचनांप्रमाणे काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने कोणती पूर्व तयारी केली आहे. येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आरोग्य विभाग व प्रशासनाने वेगळ्या काय उपाय योजना केल्या आहेत याची माहिती घेतली. लहान मुलांना होणारा धोका ओळखून वेळीच पावले उचलत आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीसाठी बालरोग तज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून लहान मुलांना कोरोनाची बाधा होवू नये यासाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जाणून घेतली. आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना त्या रुग्णांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा. त्यासाठी आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत करण्यास सदैव तयार आहे. लहान मुलांना या लाटेचा धोका पोहोचणार यासाठी बालरोग तज्ञांची समिती स्थापन करून जगजागृती केली जाणार आहे. तरीदेखील सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व कोरोनाची बाधा जरी झाली तरी घाबरून न जाता आपल्या परिवारातील इतरांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे असे नागरिकांना आवाहन केले आहे. आरोग्य विभागाने जेष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम राबवितांना योग्य नियोजन करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, उपसभापती अर्जुनराव काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉ. अजय गर्जे, नगरसेवक मंदार पहाडे, अजीज शेख, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, फकीरमामू कुरेशी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुंलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे,ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. अतिश काळे, डॉ. कुणाल गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रोहिदास होन, राहुल रोहमारे, प्रशांत वाबळे, भरत मोरे, विक्रांत झावरे, शरद खरात, तुषार पोटे, संतोष गंगवाल आदि उपस्थित होते.

फोटो ओळ:-
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या करावयाच्या उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे.
