शासनाच्या योजनांचा लाभ सभासदांपर्यंत पोहचवावा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनांचा लाभ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी सभासदांपर्यंत पोहचवावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील संस्था पातळीवर १०० टक्के वसुली झालेल्या के.बी. आबक कृषी फलोद्यान सह.संस्था संवत्सर, शिलेदारवाडी वि.का.संस्था. शिलेदारवाडी, श्रीकृष्ण वि.का. संस्था पोहेगाव, तळेगाव मळे वि.का. संस्था तळेगाव मळे, शनेश्वर महाराज वि.का. संस्था तळेगाव मळे, महेश्वर वि.का. संस्था, येसगाव, चां.बा. कोळपे वि.का. संस्था कोळपेवाडी, उमरावती वि.का. संस्था देर्डे कोऱ्हाळे, लक्ष्मी वि.का. संस्था चांदेकसारे, कैलासगिरी वि.का. संस्था कान्हेगाव, गोधेगाव नं १ वि.का. संस्था गोधेगाव आदी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जिल्हा सहकारी बँक कोपरगाव येथे करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलग दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकार राबवीत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून आपल्या संस्थांचे हित जोपासावे असे आवाहन केले.
यावेळी अॅड. आर.टी. भवर, एम.टी. रोहमारे, सहाय्यक निबंधक राजेंद्र रहाणे, तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, ऑफिस सुपरीटेंडेंट रवींद्र आवारे, विशेष वसुली अधिकारी अशोक लोहकरे, नोडल ऑफिसर सुरेश शिंदे आदींसह संस्थांचे सचिव, पदाधिकारी व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ:-
बँक स्तरावर १०० टक्के वसुली झालेल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *