
कोपरगाव प्रतिनिधी:-
रम्य ,निरागस आणि लोभस, काळजी ,चिंता यापासून कोसो दूर ,मनमुराद आनंद ,हास्य लुटण्याचे बालपणीचे दिवस. त्यामुळेच म्हटलं जातं , लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । पण दुर्दैवाने हा मनमुराद आनंद प्रत्येक बालकाचा नशिबी असतोच असे नाही.12 जून 2021 हा दिवस आपण बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करत आहोत. मुळातच बालकामगार ही समस्या देशापुढे फार पूर्वी पासून आ वासून उभी आहे. मुळातच बालकामगार असणे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कुरूप लक्षण आहे. बाल न्याय अधिनियम 2000 नुसार बालक किंवा मूल याचा अर्थ ज्याची वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नाही अशी व्यक्ती.बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 नुसार 18 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे असे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे. तरी ही सर्व नियम तुम्ही आम्ही धाब्यावर बसवतो कारण जबाबदार आहे आपल्याकडील भांडवलशाही अर्थव्यवस्था व पायमल्ली झाल्यास न होणारी जबर शिक्षा. बालकामगार ही भीषण समस्या सर्व सामाजिक समस्येचे मूळ बनत चाललेली आहे . अशिक्षित पणा व जबाबदारी चे भान न ठेवता अधिक मुलांना जन्माला घालणे यामुळे देखील बाल कामगारांमध्ये भर पडते. वरवरचे कायदे करून चालत नाही त्याची अंमलबजावणी सक्षमपणे व्हायलाच हवी. सद्यस्थिती तर खूपच भयंकर आहे covid-19 जागतिक महामारी च्या काळात सर्वत्र शाळा बंद पडून कित्येक मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. बिकट आर्थिक परिस्थिती, निरक्षर पालक, पालकांची शिक्षण विषयक उदासीनता, आणि करोना महामारीच्या काळात दुर्दैवाने आई/ वडिलांचा मृत्यू. त्यामुळे पोरके झालेली ही मुले
परिस्थितीमुळे घरकामात, धुणी-भांडी करण्यासाठी, बांधकाम व्यवसायात, इतर व्यवसायात , गाड्या धुणे, पुसणे ,चहाची टपरी ,हॉटेलमध्ये कपबशा विसळणे ,शेतीकामात, कांदा मार्केट मध्ये पाट्या उचलणे , कपाशी वेचणे, हाताखाली काम करणे, वर्तमानपत्रे टाकणे, वीटभट्टीवर मजुरी करणे इत्यादी कामे करतात. बालमजूरी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सारख्याच प्रमाणात आहे. धोकादायक व जोखमीचे कामे करतानाही बालकामगार आपल्याला दिसतात.
त्यातूनच दारिद्र्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार देखील लागला जातो परंतु याचा वाईट परिणाम म्हणजे शिक्षणापासून ही मुले कायमचे वंचित झालेले दिसतात. शिक्षणाविषयी गोडी कामामुळे कमी होते . जोखमीच्या कामांमध्ये फटाके बनवताना सुद्धा बाल कामगारांची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाते .त्यात कित्येक अपघातात ही मुले बळी देखील पडतात. समाजव्यवस्था फक्त एका दिवसापुरती हळहळ करते ,पुन्हा जैसे थे.
सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात बालकामगारांना एका नवीन गोरख धंद्यात ओढलेले दिसते. तो गोरखधंदा म्हणजे भिक्षा मागणे.आज रस्त्यावर ,टोल नाक्याजवळ, मंदिरांच्या बाहेर, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी भीक मागणाऱ्या मुला मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते.या मुलांकडून भीक मागण्याचे काम करून घेतले जाते. गुंड व आडदांड म्होरके ही कामे त्यांच्याकडून बळजबरीने करून घेतात. बालमजुरीचा हा नवीन धंदा सध्या सर्रास आणि बिनदिक्कत चालू आहे. घरातही आई-वडिलांना पैशाची चटक लागल्यामुळे
कोणत्याही मार्गाने पैसा घरात आला पाहिजे असे त्यांना वाटते .सर्वात धोकादायक बाब म्हणजे या बालकामगार मधूनच बहुतेक मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसतात हा खूप मोठा धोका समाजास होत आहे. कुटुंबाच्या दारिद्र्याचा भोग या मुलांच्या वाट्याला येतो .तुटपुंजी मजुरी, अपुरे पोषण हे सर्व या मुलांच्या नशिबी असते .कायदे प्रत्यक्षात कागदावरच आहे. याहीपुढे जाऊन मोलमजुरी पेक्षा ही भयंकर काम या मुला-मुलींकडून
करून घेतले जाते. ते म्हणजे लैंगिक शोषण.आज आपण मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये पाहिले तर वेश्याव्यवसायात सर्वात जास्त शोषण बालिकांचे होते. बंदी असूनही राजरोसपणे हे व्यवसाय चालवले जातात .या सगळ्याला ही समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था जबाबदार आहे .शिक्षित आणि सधन लोकांकडेच बालकामगारांचे प्रमाण जास्त आहे. कमी पैशात जास्त वेळ काम करून घेऊन त्यांची पिळवणूक केली जाते. शासनावर मुळातच बाल कामगारांविषयी कायदे करण्याची वेळच येऊ नये यासाठी समाजाने कुठेतरी सजगता दाखवून या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे.समाजव्यवस्थेचे हे कर्तव्य आहे. ही पिळवणूक कुठेतरी थांबली पाहिजे.हरवलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून शिक्षकांनी ,समाजातील सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले पाहिजे .या मुलांना भावनिक व मानसिक आधाराची खूप गरज असते , घरातले वातावरण तसे नसल्याने समाजात आणि शाळेत या मुलांना समजून घेण्याची गरज आहे. शासनामार्फत बालकामगार सर्वेक्षण करण्यात येते पण आकडेवारी ही फक्त कागदावरच दिसते .प्रत्यक्षात बालकामगार मुलं किती शाळेत दाखल झाली आणि किती त्या प्रवाहामध्ये टिकली हे मात्र कुठेही दिसत नाही. उलट या मुलांना100% शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल? यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. बाल कामगार विरोधी दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता त्या दिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक घटकाने ही जबाबदारी उचलली पाहिजे. एखाद्या हॉटेलमध्ये जर छोटा मुलगा चहा देत असेल तर त्या हॉटेल मालकाला विचारण्याची हिम्मत त्या नागरिकांमध्ये पाहिजे की या मुलाला तू कामावर का ठेवले? ज्यावेळी अशा सजगतेने समाज वागेल त्यावेळी नक्कीच हे प्रमाण कमी होईल आणि खऱ्या अर्थाने बाल कामगार विरोधी दिन साजरा झाला असे म्हणता येईल. समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी पुढे यायला हवे. आजची ही मुले उद्याचे भविष्य आहे. त्यासाठी शासनाने एवढेच करावे प्रत्येक पालकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे , जर काम मिळाले तर प्रत्येक पालक आपले मूल शाळेत नक्कीच पाठवेल. बालक हे देशाची संपत्ती आहे .देशाचे भावी आधारस्तंभ आहे .त्यांच्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे .बालकांना सुदृढ व शिक्षित करून सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे.
या देशातील प्रत्येक बालक त्या त्या वयात शिक्षण घेऊन देशातील बाल मजुरी समूळ नष्ट होईल तो सुदिन लवकर येवो हीच अपेक्षा..
सौ संगीता मालकर कोपरगाव.
