वाकडीच्या संभाजीनगरसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा मंजूर;आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश….

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहाता तालुक्यातील वाकडी गावांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या संभाजीनगर या महसुली गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाकडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्मशानभूमीसाठी १० गुंठे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कोपरगाव मतदार संघातील वाकडी गावातील संभाजीनगर येथे स्वतंत्र दहनभूमी अथवा स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर आमदार कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून संभाजीनगर येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत महसूल विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार राहाता व मंडळ अधिकारी पुणतांबा यांनी मौजे संभाजीनगर येथील गट क्रमांक ५२ मधील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अभिलेखांची पडताळणी केली. या गटातील एकूण ०.३७ हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे असून त्यापैकी ०.१० हेक्टर म्हणजेच १० गुंठे क्षेत्र स्मशानभूमीसाठी देण्यास योग्य असल्याचे आढळून आले. सदर जागा मोकळी, पडीत व कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणापासून मुक्त असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १३(४) नुसार ग्रामीण भागातील गावांसाठी दहनभूमी व दफनभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जागेबाबतचे ‘ड’ प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले असून नगररचना विभागाकडून आवश्यक अभिप्रायही मागविण्यात आला आहे.
स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेचा अंतिम ताबा ग्रामपंचायतीकडे देण्यापूर्वी भूमि अभिलेख विभागामार्फत अधिकृत मोजणी करण्यात येणार आहे. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यानंतर स्मशानभूमी उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.संभाजीनगर ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण असून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आमदार विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
