के.जे.सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्यावतीने एक दिवसीय वेबिनार आयोजित…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“म्युचल फंड मधील गुंतवणूक अधिक परतावा देणारी व सुरक्षित गुंतवणूक आहे. कमी वयात गुंतवणूक सुरू केल्यास व दीर्घ काळ ठेवल्यास त्याचे फायदे देखील जास्त मिळतात कमीत कमी गुंतवणुकीचा कालखंड तीन वर्षे असावा.” असे प्रतिपादन पुणे स्थित अश्मी इन्व्हेस्टमेंट चे संचालक माननीय अमोघ भीषीकर यांनी येथे केले.
स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्यावतीने आयोजित एक दिवसीय वेबिनार मध्ये प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव होते.
मा. भीषीकर पुढे म्हणाले की, प्रत्येक नोकरदारासाठी किंवा बऱ्यापैकी उत्पन्न असणाऱ्या इतर घटकांसाठी गुंतवणूक ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अशा लोकांचे अनेक प्रश्न आणि जिज्ञासा असतात. त्यांची सोडवणूक करणे हाही एक उद्देश आमचा आहे गुंतवणूक कशी असावी ? तर ती २० % सोने व विम्याच्या स्वरूपात असावी ४० % भागबाजार किंवा इक्विटीच्या आणि ४०% डेबट किंवा स्थिर गुंतवणूक असावी. ‘रूल ऑफ ७२’ चा वापर करून आपण आपल्या गुंतवणुकीवरील परतावा जाणून घेऊ शकतो.” आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ‘एफ.डी’ जरूर रही है म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज स्वरूपात वाढ मिळत असल्याने त्याला प्राधान्य द्यावे असेही ते म्हणाले. या प्रसंगी त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिलीत. श्री. भीषीकर अनेक नामांकित संस्थांचे वित्तीय सल्लागार तसेच वरिष्ठ आर्थिक सल्लागार आहेत.
को.ता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयात कोविड महामारी काळात देखील ऑनलाईन स्वरूपात होत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. वेबिनारचे संयोजक व वाणिज्य विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रो. एस. आर. पगारे यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला. या वेबिनारसाठी तब्बल १३९ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. आय. क्यू. ए. सी. विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. सी. ठाणगे यांनी वेबिनारला उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांचे स्वागत करतानाच अशा उपक्रमांचा वारंवार लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे डॉ. एस. एल. अरगडे यांनी केले. तर आर. ए. जाधव यांनी आभार मानले. प्रा. अजित धनवटे यांनी वेबिनार यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *