कोपरगाव प्रतिनिधी:-
” स्वतःला विसरून इतरांना ओळखण्यातच आपले आयुष्य खर्ची करतो म्हणून आपण अयशस्वी होतो,त्याऐवजी स्वतःला ओळखून , स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत, आपल्या क्षमता ओळखून त्यानुसार संधी शोधल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल” असे प्रतिपादन कोपरगावचे शहर पोलीस निरीक्षक (पी.आय.)मा.वासुदेव देसले यांनीयेथे केले.ते के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे होते.
मा. देसले पुढे म्हणाले की “आपल्या क्षमतेला एकाच उद्दिष्टावर केंद्रित करा. आयुष्यात दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. वापरात येणाऱ्या क्षमताच विकसित होत असतात अन्यथा त्या नष्ट होतात. आपल्या आजूबाजूला वावरणारे पशुपक्षी देखील आपल्याला खूप काही शिकवतात. पोलीस खात्यात आता शारीरिक क्षमते बरोबरच बौद्धिक क्षमता देखील अधिक महत्वाची आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून खूप अभ्यास करा.त्याचबरोबर चांगलेव सुसंस्कृत नागरिक बनण्याचादेखील प्रयत्न करा.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे म्हणाले की मा. देसले साहेब हे एक उच्चविद्याविभूषित , बुद्धिमान व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी जिद्दीने स्पर्धेला सामोरे जावे तरच ते यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड विसरावा आणि डॉ.आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम या सारख्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.”
या प्रसंगी को.ता.एज्यु. सोसायटीचे सचिव मा.ऍड. संजीवदादा कुलकर्णी म्हणाले की, ” मा. देसले साहेबांची शिक्षणातील कर्तबगारी वाखाणण्याजोगी आहे.ते एक परिपूर्ण अधिकारी आहेत. त्यांच्यापासुनधडा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वबळावर व प्रशिक्षणाचा जास्तीतजास्त लाभ घेऊन पोलीस व सेनादलात जाण्याचा प्रयत्न करावा.या प्रशिक्षणाचा तुम्हाला नोकरीच्या काळात नक्कीच उपयोग होईल तसेच हि शिस्त आयुष्यभर कामास येईल.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या ठळक घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकला. तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा तरच या आयोजनाचा उद्देश सफल होईल अशी प्रांजळ अपेक्षाही व्यक्त केली.यावेळी प्रशिक्षणार्थी उमेदवारांपैकी श्री. फयाज तांबोळी, कु. अर्चना चव्हाण व श्री. स्वप्नील पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उदघाटन समारंभाचे प्रास्तविक करताना स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा व उदिदष्टये स्पष्ट करून मा.देसले साहेबांचा विस्तृत परिचय करून दिला. त्याच बरोबर अजूनही ज्यांना या विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल अशा उमेदवारांनीआमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील केले.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुनिल कुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. रवींद्र जाधव यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ :- के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रशिक्षणार्थीना संबोधित करताना कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक मा. वासुदेव देसले साहेब.
