विस्थापितांच्या भावनांशी कुणीही खेळू नका:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मी सर्वपक्षीय प्रतिनिधींना सोबत घेऊन शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकवेळा प्रयत्न केले हे सर्वांना माहित आहे.तरीही कुणी जागा मिळवून देण्यासाठी वॅट्सअपवर मेसेज पाठवून विस्थापितांना वेड्यात काढीत असेल तर माझा नाईलाज आहे.विस्थापित बंधुना माझी विनंती आहे,तुम्ही सावध व्हा.कारण निवडणूक जवळ आल्याने अनेक तथाकथित समाजसेवक तुमची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील.
कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी येवला रोड, एस.जी.विद्यालय पश्चिमेकडील भिंती लगत,धारणगाव रोड,चर्च जवळ,बाजारतळ,काँग्रेस कमिटी जवळ अशा अनेक जागांवर खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकदा प्रयत्न केले.पण शासन रस्त्यालगत परवानगीच द्यायला तयार नाही.म्हणून मी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळही घेऊन अहमदनगर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो.शहरातील अनेकजण माझ्यासोबत होते.मी माझ्या कुवतीनुसार सर्वांना सोबत घेऊन करत असलेले प्रयत्न माहित असूनही पत्रकबाजी करणाऱ्यांना मी विचारतो कि,माझ्यावर टिका करा.पण हिंमत असेल तर माजी आमदारांना विचारून बघा कि,राज्यात व देशात तुमच्याच पक्षाची सत्ता असतांना विस्थापितांना न्याय का मिळवून दिला नाही?संगमनेर, सिन्नर येथील बस स्थानकाजवळ अनेक गाळे बांधण्यात आले,तसे कोपरगाव बसस्थानकाजवळ का बांधले नाहीत? घाईघाईने श्रेय मिळविण्यासाठी भूमिपूजन का उरकले? मी 3 वेळा शहर विकासाचे प्रस्ताव मा.मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले,त्यावेळी का अडथळे आणले? 11 वर्षांपूर्वी अतिक्रमण हटविले जात असतांना व्यावसायिकांच्या बाजूने तुम्ही कुणीही का उभे राहिले नाही?
विस्थापितांच्या जागा दुसऱ्यांनी बळकाविल्या,परस्पर भाड्याने दिल्या,हे आता पत्रकबाजी करणाऱ्यांना दिसत नाही का? वॉट्सअपवर माझ्याविरुद्ध लिहून नेत्यांची शाबासकी मिळेल,पण येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये. शासन जर परवानगीच देत नाही,तरीही आपण खोका शॉप उभे केले तर शासन पुन्हा अतिक्रमणे काढून टाकील हे हुशार व्यक्तींच्या लक्षात येत नाही का? कि गरीब व्यावसायिकांचे पुन्हा आर्थिक वाटोळे करायचे? ज्यावेळी भाजपाचे सरकार व भाजपाच्याच आमदार होत्या त्यावेळीच शासनाकडून परवानगी का मिळविली नाही? तसे केले नाही.कारण नगराध्यक्ष वहाडणे यांच्या काळात खोका शॉप झाले तर श्रेयही वहाडणे यांनाच मिळेल याच कारणाने विस्थापितांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
निवडणूक जवळ येईल तसतसे काही समाजसेवक जास्तच चवताळणार आहेत.
विस्थापितांच्या जागा हडपून अतिक्रमणे करणारे,हातगाड्या,फेरीवाले
टपरीवाल्यांकडून हप्ते घेणारे कोण कोण आहेत?त्यांच्याविरुद्ध बोलतांना शेपूट का घालता? फक्त निवडणूक पार पडेपर्यंत
विस्थापितांना नादी लावणारे कोण व स्पष्टपणे वस्तुस्थिती सांगणारे व मनापासून प्रयत्न करणारे कोण आहेत हे जनतेला माहित आहे.श्री.बालाजी गोर्डे यांचे वडिलही माझे मित्रच.त्यांनी दुकान विकत घेतले व त्याचवेळी अतिक्रमणे हटाव मोहीम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले हे खरे आहे.त्यांचेकडून पैसे उकळणारे दिवंगत न.प. कर्मचारी कुणाचे बैठकीतील साथीदार होते हे मी सांगायची गरज नाही.जागा मिळावी ही त्यांची अपेक्षा बरोबरच आहे.पण त्यांना व इतरही विस्थापितांनाअधिकृतपणे जागा द्यायला शासनाची परवानगी मिळालेली नाही.
आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन प्रयत्न केले तरी खोका शॉपसाठी परवानगी मिळाली नाही.केवळ बाजारतळ याठिकाणी काही खोका शॉप व काँग्रेस कमिटीजवळ खोका शॉप किंवा गाळे यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे,तसे प्रयत्न-तशी प्रक्रियाही सुरू आहे.विस्थापितांना खुश करण्यासाठी मी खोटे आश्वासन देणार नाही.मी सांगतोय ती वस्तुस्थिती आहे.यानंतरही कुणी विस्थापितांना जागा मिळवून देऊ असे सांगून भावनांशी खेळणार असेल तर मी काय बोलणार?
सर्व शहरवासीयांना रस्त्याने व्यवस्थित येजा करता यावी,रहदारीला अडथळे येऊ नयेत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.हातगाड्या,पथाऱ्या,शेड याबाबत तक्रारी येत असल्याने,नगरपरिषदेला कारवाई करावी लागते,त्यातूनच संघर्ष वाढतो. म्हणून कुणीही रस्त्याला-रहदारीला अडथळे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करू नये.अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे,अनेकजण रजेवर जाण्याच्या मनस्थितीत आहेत.हे शहर विकासाला घातक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *