देवळालीचे आदिवासी बांधव आजही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचीत असल्याची खंत:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळालीचे आदिवासी बांधव आजही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचीत असल्याची खंत आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केली.
देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधी प्रसंगी आलेला धक्कादायक अनुभव विशद करताना आमचे प्रतिनिधींशी ढुस बोलत होते.
देवळाली प्रवरा गावातील अठरा पगड जातीमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा काय आहेत हेच माहीत नसलेल्या येथील अपरिपक्व नेतृत्वामुळे देवळाली प्रवरा मधील आदिवासी समाज त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा येथील राजकीय नेत्यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत.
काल या आदिवासी बांधवाच्या अंत्यविधी प्रसंगी मन हेलावून टाकणारे प्रसंग पहावयास मिळाले.. या आदिवासी बांधवाना अंत्यविधी साठी जवळपास हक्काची अशी स्मशानभूमी किंवा जागा उपलब्ध नसलेने सकाळ पासून ओढ्याचे कडेला किंवा अन्यत्र जागा शोधनेसाठी चालू असलेली आदिवासी बांधवांची धडपड ह्रदय पिळवटून टाकीत होती.
बराच काळ सुरु असलेल्या शोध मोहिमेनंतर एका चर/ नाल्याजवळ अंत्यविधीची जागा निश्चित झाली. तेथील वेड्या बाभळीच्या काट्या काढून जागा साफ करायला दोन तास गेले.. जागा खोदून तयारी करायला पुढील तितकाच वेळ .. एकूण काय तर त्या अंत्यविधीची चालू असलेली परवड पाहवत नव्हती. परवा रात्री मृत्यू पावलेल्या या आदिवासी बांधवाचा अंत्यविधी थेट काल सायंकाळी साडे सात वाजता झाला.. यामध्ये पोस्ट मॉर्टेम, पोलीस, डॉक्टर या सर्व प्रक्रियेत दिवस गेला…
एकीकडे या आदिवासी बांधवांची होणारी परवड थांबेना तर दुसरीकडे काही राजकीय मंडळींनी पुढील निवडणूक समोर ठेवून सभा समारंभ, मेळावे यांचे आयोजन करण्यात आणि पुढील निवडणूक आम्हीच कशी जिंकणार हे जनतेला पटवून देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कधी गावभर पोस्टरबाजी करून, तर कधी स्वतःला स्वयंघोषित देवदूत म्हणवून घेत तर कधी वेळप्रसंगी स्वखर्चाने स्वतःची पाठ थोपटून जनतेच्या नजरेत नसलेली पत निर्माण करणेसाठी विविध प्रकारचे हातखंडे वापरले जात आहेत.
या सभा समारंभात प्रभू श्री रामचंद्राचा इतिहास सांगणारे माता शबरीला आणि तिच्या आदिवासी बांधवांना मात्र चक्क विसरले आहेत, ते ज्या गावात प्रभू रामचंद्राचा इतिहास सांगत आहेत त्याच गावात माता शबरीचे असंख्य अनुयायी बांधव राहतात हे तर ते विसरलेच.., शिवाय इतिहास संगणार्यांनी ज्यांच्या स्टेजवर बसून इतिहास सांगितला त्यांनीच नगरपालिका स्थापनेपासून आजपावेतो या माता शबरीच्या अनुयायांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले आहे याचाही विसर त्यांना पडला आहे. हे तर विसरलेच परंतु गावाचा इतिहासही हे विसरले. शालेय बालभारतीच्या पुस्तकात पूर्वी देवळालीतील भिल्लांचा वाड्याचा धडा होता. असी थोर परंपरा असलेल्या या वाड्याची जपणुक तर केली नाहीच. आदिवासी बांधवांना त्यांचे मुलंभुत हक्कापासुन दुर ठेवण्याचे पापही यांनी केले आहे. आणि तरीही काही मंडळींना मात्र पुढील निवडणुकीत एकहाती सत्तेचे डोहाळे लागले आहेत. आपल्या पक्षाची शहर कार्यकारणी करताना ना आदिवासी आठवले ना मागासवगीॅय.., ना ओबीसी… यांना गांव न् पक्ष स्वत:ची खासगी कंपनी वाटत आहे. अश्या मंडळींना देवळाली प्रवरा येथील आदिवासी बांधव कधीही माफ करणार नाही.
देवळाली प्रवरा शहराच्या पश्चिम भागात जवळपास ६५ एकर क्षेत्रात १५० आदिवासी समाजाची घरे आहे. इनामवस्ती म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग नगरपालिकेचे निवडणुकीसाठी आदिवासी प्रभाग म्हणून राखीव ठेवलेला असतो. त्यामुळे नगरपालिकेला हा भाग माहीत नाही असे कदापी म्हणता येणार नाही.
देवळाली प्रवरा नगरपालिकेची स्थापना १९८३ साली झाली.. तेंव्हापासून आजपावेतो आदिवासी समाजाची जवळपास २५० लोकवस्ती असलेला हा इनामवस्तीचा भाग या मंडळींनी जाणीवपूर्वक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवला आहे. आजपर्यंत कोणालाही या समाजासाठी आणि तेथील लोकवस्तीसाठी काही करणेची गरज वाटली नाही. फक्त निवडणूका आल्या की मग या आदिवासी समाजाची सर्वांना आठवण येते.
आजही देवळालीच्या या इनामवस्ती मधील आदिवासी बांधवाना स्वतंत्र स्मशानभूमी नाही.., सार्वजनिक शौचालय नाही.., घरकुल नाही, रस्ते नाही.. गटार नाही.., स्ट्रीट लाईट नाही.. शाळा नाही.. येथे १० x १० च्या एकाच वर्ग खोलीत इयत्ता पहीली ते चौथीची शाळा भरते… आणि गावातील नेत्यांना मात्र निवडणुकीचे वेध लागलेत.
जनतेने अत्यंत विस्वासाने यांच्या हाती एकहाती सत्ता दिली. तरी गावातील अठरा पगड जाती मधील बांधवांच्या मूलभूत गरजा यांना पूर्ण करता आल्या नाहीत.. स्वतःला जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणवणारे जर स्वतःच्या गावातील आदिवासी समाजाला तब्बल ३८ वर्षे त्यांचे मूलभूत अधिकार व सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर.., यांच्या हाती जिल्हा देऊन काय जिल्हा भकास करायचा का हे जिल्ह्यातील जनतेनेच ठरवावे.
देवळाली प्रवरा येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी प्रश्ना संदर्भात लवकरच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार असल्याचे शेवटी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *