जीवाची पर्वा न करता काम करणा-या आशा सेविकांच्या मानधनात वाढ करा:- सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांची आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक जण काळजी घेत असुन कोरोनापासुन बचाव करण्याच्या दृष्टीने घरात थांबून आहे. सध्याच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या कठीण काळात आशा सेविका मात्र घरोघरी जाउन काम करीत आहेत. परंतु या आशा सेविकांना मिळत असलेल्या कमी मानधनामुळे कुटुंबाचा गाडा चालविणे जिकरीचे बनले आहे. त्याकरीता शासनाने आशा सेविकांचे मानधनात तातडीने वाढ करावी. तसेच आशा सेविकांसाठी विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेशजी टोपे यांचेकडे केली आहे.
ना टोपे यांना पाठविलेल्या निवेदनात सौ कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशासह राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासह विविध सामाजिक संस्थाकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्या यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाॅकडाउनमुळे सध्या प्रत्येकजण घरात थांबून आहेत, या कठीण परिस्थितीमध्ये आशा सेविका मात्र दारोदार फिरून काम करत आहे. खेडयापाडयामध्ये, वाडया -वस्त्यावर फिरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट घरोघरी जाउन काम करणा-या या कोरोना योध्दयांना मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. काम करतांना जीवही सांभाळायचा आणि कुटूंबही सांभाळायचे अशी दुहेरी कसरत करत असलेल्या आशा सेविकांना शासनाने विमा सुरक्षा कवच दयावे, तसेच त्यांच्या मानधनात तातडीने वाढ करून कुटुंबाला हातभार लावावा, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *