
कोपरगाव प्रतिनिधी
राहुरी विद्यापीठ:-
मुंबईत सुरु असलेल्या ए.आय. फॉर अॅग्री आणि गुंतवणुकदार जागतिक परिषद-2026 या परिषदेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोग आणि किडींची ओळख या कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारीत अॅपचे अनावरण करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या ए.आय. अॅपसाठी माहिती तयार करण्यात आली होती. विद्यापीठाच्या या योगदानाबद्दल यावेळी कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोकरा, कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब, आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या अॅपची निर्मिती करण्यात आली असून कृषि विभागाचे लोकप्रिय महाविस्तार मोबाईल अॅपमध्ये या रोग आणि किडींची ओळख या अॅपचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे विविध पिकांवरील रोग आणि किड यांचे फोटोवरुन शेतकर्यांना त्यांच्या पिकांवरील रोग व किडींचे निदान करुन त्यांच्या नियंत्रणाकरीता उपाययोजना त्वरीत सुचवल्या जातील. या अॅपमुळे शेतकर्यांना त्यांच्या पिकांवरील रोग आणि किडींचे वेळेवर अचूक निदान व त्यावरील उपाय यामुळे त्यांचा औषधांवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या या अॅपमध्ये 18 पिकांचे विविध 69 रोग आणि 35 किडींची पूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या अॅपमध्ये राज्यातील उर्वरीत पिकांवरील किडी आणि रोगांची माहिती लवकरच समाविष्ट करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये योगदान दिल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी किड व रोग शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी आणि इतर संबंधीत प्राध्यापक ज्यांनी या अॅपसाठी योगदान दिले आहे त्यांचे अभिनंदन केले आहे.
