आयुष्यात यश मिळवण्यासाठी एकमेव पर्याय मेहनत :- कल्पेशकुमार चव्हाण…
श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
कोपरगाव प्रतिनिधी: “जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसून केवळ सततची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगली संगत हेच यशाचे खरे सूत्र आहे. स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात एका-एका मार्काची किंमत काय असते, हे ज्याला कळते तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो,” असे प्रतिपादन शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयात शनिवारी (दि.3) ‘गुरुकुल प्रकल्पा’अंतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार रोहित टेके होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद लबडे, माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, माजी सदस्य गोरख टेके, राजेंद्र बाराहाते, पंडित वीर, राजेंद्र शिंदे, उत्तमराव वाकचौरे, सुकृत गोर्डे, दिनेश निकम, रोहित सूर्यवंशी, मुख्याध्यापक शरीफ शेख, कैलास शेळके, वसंत जाधव, तुकाराम जेठे, सिताराम झुराळे, शालिनी कर्पे, अनिसा पठाण यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
चव्हाण म्हणाले, “डी.एड.ला नाशिक जिल्ह्यात ९१.५०% मिळवून प्रथम आलो, पी.एस.आय.च्या ट्रेनिंगमध्ये मानाची तलवार मिळाली; पण त्याआधी मी प्रचंड संघर्ष केला आहे. तलाठी, एक्साईज इन्स्पेक्टर, पोलीस भरती अशा अनेक परीक्षांमध्ये मी अवघ्या १-१ मार्काने अपयशी ठरलो होतो. अगदी जळगाव आणि मुंबई पोलीस भरतीत ९६ गुण मिळवूनही मेरिटमध्ये अवघ्या एका गुणाने मागे राहिलो. एवढेच नाही तर, डी.वाय.एस.पी.च्या परीक्षेत केवळ एका प्रश्नाच्या (अडीच मार्कांच्या) फरकाने माझी संधी हुकली. त्यामुळे एका मार्काचे महत्त्व कधीही कमी समजू नका. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आजच्या काळात ड्रग्ज, दारू, सोशल मीडियाचा गैरवापर आणि वाईट संगतीमुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी स्वतःला विशिष्ट नियम आणि शिस्त लावून घेतली पाहिजे. “कठोर मेहनत करून स्वतःला सिद्ध करा, गावातून जेव्हा तुमची यशाची मिरवणूक निघेल, तो आनंद आयुष्यभरासाठी तुमच्या पाठीशी राहील,” असा संदेश त्यांनी दिला.
प्रमोद लबडे यांनी विद्यार्थ्यांसमवेत आपल्या संभाषण कौशल्यातून एकरूप होत विविध विषयांना हात घातला. या संवादास विद्यार्थ्यांनीही भरघोस प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित टेके यांनी रामेश्वर विद्यालयाच्या गुणवत्ता व भौतिक सुविधांच्या उपलब्धीविषयी उपस्थित त्यांना अवगत केले व दातृत्वाच्या भावनेतून विद्यालयास मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले तर गोरख टेके यांनी आभार मानले.

फोटो ओळी:-
श्री रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
