
कोपरगाव प्रतिनिधी :-स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. गुरूवार दि. 12 ते शनिवार दि. 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. डॉ. धोंडीराम पवार यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदिप रोहमारे, प्रसिद्ध कवि, गीतकार व पटकथा लेखक मा. रविन्द्र कांगणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. प्रशांत घुले, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या उद्धाटकीय मनोगतात डॉ. धोंडीराम पवार यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटनाची उद्घोषणा करतानांच संशोधन म्हणजे माहितीच्या आधारे सत्याचा शोध घेणे व ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे होय. संशोधन हे ज्ञानाचा साठा वाढविण्यासाठी हाती घेतलेले सर्जनशील आणि पद्धतशीर कार्य असल्याचे म्हटले. मा. रविन्द्र कांगणे यांनी अनेक कवितेच्या सादरीकरणातुन साहित्य निर्मितीची प्रक्रिया व जीवनाचे वास्तव मांडले. अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करतांनाच संशोधन पद्धती या विषयावर आधारित या कार्यशाळेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन नवनिर्माण साकार होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व संशोधनपरक दृष्टिकोण वाढीसाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात उपस्थितांचे स्वागत करतांनाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ही नाविन्यपूर्ण कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित करण्याची संधि उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात संशोधन प्रकल्प यासारखे विषय समाविष्ट असल्याने संशोधन पद्धती या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या ह्या कार्यशाळेचा फायदा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद व्यक्त केला. या तीन दिवसीय कार्यशाळेत डॉ. दिगंबर घोडके, डॉ. अशोक गायकवाड, प्रा. अमोल चिने, प्रा. श्रीकांत जोशी, मा. सुहास नाईक-साटम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. गणेश निमसे, डॉ. सुनील मोहटे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सत्रे संपन्न झाली. विविध विषयावर आधारित या मार्गदर्शन सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांबरोबरच महाविद्यालयातील संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी यांची उपस्थिति लक्षणीय होती. उद्घाटन सत्र कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय दवंगे यांनी या विद्यापीठस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळेची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चिने यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. कार्यशाळेच्या समारोप समारंभ कार्यक्रमात आयोजक व इतर महाविद्यालयातुन उपस्थित असलेल्या सहभागी विद्यार्थ्यानी या तीन दिवसीय कार्यशाळेचा गुणात्मक अहवाल सादर करतांना महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे आयोजन प्रशंसनीय व अनुकरणीय असल्याचे म्हंटले. यावेळी उपस्थित सहभागी विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजनाच्या सर्व समित्यांचे कामकाज व्यवस्थित व नियोजनबद्ध केल्याने ही कार्यशाळा यशस्वी झाल्याची कौतुकाची थाप जिल्हा समन्वयक डॉ. सुनील मोहटे यांनी दिली. या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड़, डॉ. संजय दवंगे, प्रा. रोहिणी घुगे व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी केले.
