
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या जगभरात प्रत्येक जाणकारांच्या मते जर विश्व युद्ध झाले तर हे फक्त पाण्यावरूनच होऊ शकते अशी चर्चा सुरू असून ती उगाचच नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते तथा निर्माते चिन्मय उदगीरकर यांनी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करत माझ्या दारी मी माझे कर्तव्य बजावले, आता आपली जबाबदारी या उपक्रमाचे माहिती फलक अनावरण प्रसंगी बोलताना व्यक्त करत रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी योग योगेश्वर जय शंकर या मराठी मालिकेचे निर्माते संजय झनकर, शंकर महाराजांची भूमिका साकारणारा बाल कलाकार अरूष, नमामी गोदाचे राजेश पंडित, संकेत शिंदे, निलेश सूर्यवंशी यांच्यासह गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे उपस्थित होते.

याविषयी अभिनेते उदगीरकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, जमिनीतील भूजल साठा हा अत्यंत कमी झाला असून पृथ्वीच्या पोटातील जवळपास ७० टक्के पाणी साठा हा संपलेला आहे यामुळे येणाऱ्या काळात अनेक भागांचे वाळवंट होऊ शकते अशी भीती सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत .त्यामुळे आता पाणी प्रश्न हा जागतिक दर्जाचा प्रश्न तयार झाला असून याच मुद्यावर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते की काय अशी भीती उगाचच वाटत नसून जे भाग कधी काळी पाण्याने सुजलाम सुफलाम होती उन्हाळ्यात त्याच भागात पिण्यासाठी बाहेरून पाणी आयात करावे लागते इतकी नामुष्की सध्या पृथ्वीवर निर्माण झाली आहे. कित्येक भागात सततच्या दुष्काळाने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन तो भाग भकास होत आहे तर तेथील अनेक कंपन्यांना कुलूप लावावे लागत आहे. त्यामुळे आताच इतके सारे वाईट परिणाम सुरू असताना देखील असे वाटते की आपण या पाणी प्रश्नाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतोय, कारण ही पाणी समस्या आपल्याला सर्वच भागात म्हणावी अशी भेडसावत नाहीये परंतु या गोष्टीकडे आत्ताच गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात नक्कीच हा पाणी प्रश्न आ वासून उभा असेल आणि त्यातूनच माणूस- माणूस,गल्ली-गल्ली, प्रांत-प्रांत किंबहुना देशा-देशात वाद होऊन यातूनच तिसरे महायुद्ध उभे राहू शकते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक कुटुंबाने ही बाब गांभीर्याने घेत रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या दारी, मी माझे कर्तव्य बजावले, आता आपली जबाबदारी या म्हणीप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करत पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त निचरा आपल्या सभोवतालच्या जमिनीत करत आपण आपली पाण्याची स्वतः बँक निर्माण करावी (माय वॉटर बँक रिचार्ज )अन्यथा याचे परिणाम भविष्यात भयावह होऊ शकतात अशी भीती मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
