
प्रशासनाची कारवाई अनधिकृत भूमिपूजनाचा फलक हटवला सत्ताधारी कोल्हे गटावर नामुष्की…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराच्या सुखशांती नगरमधील संरक्षक भिंतीच्या कामाचे अनधिकृत भूमिपूजन सत्ताधारी कोल्हे गटाला आणि कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून निवेदन दिल्यानंतर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने कारवाई करून सदरच्या अनधिकृत भूमिपूजनाचा फलक हटविल्यामुळे सत्ताधारी कोल्हे गटावर नामुष्की ओढवली आहे. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी सत्तेचा गैरवापर करून आयत्या पिठावर रेघा ओढून कुणाच्या हौसेसाठी अनधिकृत भूमिपूजनं करू नका असे खडे बोल सत्ताधारी कोल्हे गटाला सुनावले आहे.
कोपरगाव शहरातील प्र.क्र.०२ मधील सुख-शांती नगर मध्ये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामासाठी आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून जवळपास २२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक होवून दोन महिने झाले असून एकही बैठक व्यवस्थित पार पडलेली नाही.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोट्यावधींचा निधी आणला आहे. त्यांच्या कामाचे श्रेय घेऊन सत्ताधारी कोल्हे गटाने आपल्या नेत्याला खूष करण्यासाठी राजशिष्टाचार न पाळता परस्पर मोजक्याच नगरसेवकांच्या व काही नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन केले ते देखील दि.१५ रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी आपला रोष व्यक्त करून कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी पापडीवाल यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे की,कोपरगाव नगरपरिषदेवर प्रशासक असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्र.क्र.०२ मधील ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी ती मागणी मान्य करून २२ लाख रुपये निधी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामासाठी दिला आहे. त्याचा नगरपालिका सत्ताधारी कोल्हे गटाचा कुठेही संबंध नाही व दोन महिन्यात पालिकेला कोणताही नवीन निधी उपलब्ध झालेला नाही. अशी परिस्थिती असतांना त्या प्रभागातील स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना डावलून ज्यांचा नगरपरिषदेशी कोणताही कायदेशीर संबंध नाही किंवा ते प्रशासकीय नियमावलीत बसत नाहीत अशा लोकांच्या हस्ते करण्यात आलेले भूमिपूजन अनधिकृत असल्याचे सांगत त्या भूमिपूजनाचा फलक काढण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी मागणी केली असता नगरपालिका प्रशासनाला सदरचा फलक हटविण्याची नामुष्की ओढवली आहे.
चौकट :- सत्ता असो व नसो विकासकामांना आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणार पण नाही कारण आमचे नेते आमदार आशुतोष काळे यांची विकासासोबत उभं राहण्याची आम्हाला शिकवण आहे. मात्र कोणत्याही कामाचे भूमिपूजन करतांना नगराध्यक्ष आणि नगरपालिका प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात घ्यावे. आम्ही प्रत्येक विकास कामात तुमच्या सोबत राहू.- शैलेश साबळे (कार्यकर्ते राष्ट्रवादी)
