कर्मवीर शंकररावजी काळे कोविड केअर सेंटरमध्ये नमाज पठण..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांना स्वत:च्या धर्माविषयी प्रेम असून प्रत्येक समाजाचा नागरिक रूढी परंपरानुसार आपले सण उत्सव साजरे करीत असतो. मात्र कोरोना संकटामुळे प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्यामुळे धार्मिक भावनांना देखील मुरड घालावी लागत आहे. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या मुस्लीम बांधवाना देखील रमजान ईदची पवित्र नमाज अदा करता येणार का नाही याबाबत चिंता पडली होती. मात्र सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी बाधित मुस्लीम बांधवांची चिंता दूर करून कोविड केअर सेंटरमध्येच पवित्र नमाज अदा करण्यासाठी योग्य सुविधा निर्माण करून दिल्यामुळे बाधित मुस्लीम बांधवांना नमाज अदा करता आली.

                 कोरोना विषाणूने संपूर्ण विश्वात घातलेल्या थैमानापुढे हतबल झालेल्या जगाला वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्यात देखील दुसऱ्या लाटेमुळे लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामुळे शासनाला देखील नाईलाजास्तव पुन्हा एकदा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे सर्वच धार्मिक सण उत्सव साजरे करतांना बंधने घालण्यात आली आहेत. शुक्रवार (दि.१४) रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद हा सुवर्णयोग जुळून आला. मुस्लीम बांधवानी मस्जिदमध्ये न जाता घरीच पवित्र नमाज अदा केली तर अक्षयतृतीये निमित्त घराघरात पुरणपोळी-आमरसाचा मेनू होता. आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमधील बाधित रुग्णांना देखील  गोडधोड जेवण देण्यात आले व मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी सुविधा देखील निर्माण करून दिली. मुस्लीम बांधवांनी पवित्र नमाज अदा करून विश्वावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी दुवा केली. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या सर्व बाधित रुग्णांमध्ये सामाजिक एकोप्याचे आगळेवेगळे दर्शन घडले.

फोटो ओळ:-
कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये रमजान ईदची पवित्र नमाज अदा करतांना बाधित मुस्लीम बांधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *