शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवा :- आ.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी –
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी राज्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यात यंदा मका उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून कोपरगाव मतदार संघही त्याला अपवाद नाही. कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाने मका विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतु अद्याप पर्यंत मका खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक नड पूर्ण करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विकली असून खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी करत आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण ओळखून शासकीय दराने मका खरेदी सुरु करून कोपरगाव तालुक्यात मका खरेदीसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की,केंद्र शासनाने मका पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली असली तरी कोपरगाव तालुक्यात एकमेव शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध असून ते तालुक्याच्या सीमेवर शेवटच्या टोकाला बहादराबाद येथे आहे व त्या ठिकाणी मका विक्री करण्यासाठी मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी त्या ठिकाणी अद्यापही मका खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात मका विकावी लागत आहे. वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे वाढते दर, मजुरी, वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असून मका पिकाला हमीभाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावू शकते.

मका हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक असून पशुखाद्य, उद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात त्याला मोठी मागणी आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात शासनाकडून थेट खरेदीची व्यवस्था असूनही खरेदी सुरु झालेली नाही त्यामुळे खाजगी व्यापारी दर पाडून मका खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशा वेळी हमीभाव मिळाला नाही, तर पिकासाठी घेतलेल्या कर्जाची फेड कशी करायची, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात तातडीने शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करावी व शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांची संख्या वाढवून त्या मार्फत मकाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *