
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
सध्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात आंबा बागांमध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी मोहोर अवस्थेत तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. विशेषतः अॅम्रिटोडस अॅटकिन्सोनी या प्रजातीचा प्रादुर्भाव काही बागांमध्ये तीव्र स्वरूपात आढळून येत आहे. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग) व किटकशास्त्रज्ञ डॉ. सखाराम आघाव (किटकशास्त्र विभाग) यांच्याकडून शेतकर्यांना तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास वेळीच उपाययोजना कराव्या असा सल्ला देण्यात येत आहे.
तुडतुड्यांची पिल्ले व प्रौढ अवस्था पाने, मोहोर व लहान फळांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे फुलकळ्या व फुले कोमेजून गळून पडतात तसेच नुकतीच लागलेली लहान फळे मोठ्या प्रमाणावर गळतात. किडीच्या चिकट गोड स्रावावर काळी बुरशी (सूटी मोल्ड) वाढून प्रकाशसंश्लेषणात अडथळा निर्माण होतो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास 20 ते 100 टक्क्यांपर्यंत उत्पादनामधे घट होण्याची शक्यता आहे. 10 तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर याप्रमाणे आर्थिक नुकसान पातळी आढळल्यास तात्काळ नियंत्रण उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करतांना झाडांची योग्य छाटणी करून बागेत हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्यावी. बाग तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळून संतुलित खत व्यवस्थापन करावे. प्रादुर्भावाच्या सुरुवातीला अॅझाडिरॅक्टीन (10000 पी.पी.एम.) या निमयुक्त किटकनाशकाची 2-3 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आंब्याला मोहोर येत असतांना लेकॅनीसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम अॅनिसोप्लिया या जैविकबुरशीयुक्त किटकनाशकाची 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात 7 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास व मित्र किटकांचे संवर्धन लक्षात घेऊन पुढीलपैकी एक किटकनाशक आलटून-पालटून वापरावे: बुप्रोफेझिन (25 टक्के एस.सी.) 1 ते 2 मिली किंवा फ्लोनिकॅमिड (50 टक्के डब्ल्यू.जी.) 0.4 ग्रॅम किंवा पायमेट्रोझाईन (50 टक्के डब्ल्यू.जी.) 0.3 ग्रॅम किंवा टोलफेनपायरॅड (15 टक्के ई.सी.) 2 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड (17.80 टक्के एस.एल.) 0.4 मिली किंवा थायामेथोक्साम (25 टक्के डब्ल्यू.जी.) 0.1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. ही सर्व किटकनाशके लेबलक्लेमप्राप्त आहेत. आंबा उत्पादक शेतकर्यांनी बागेची नियमित पाहणी करून तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळताच वरील शिफारशीनुसार त्वरीत उपाययोजना कराव्यात असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील हॉर्टसॅप प्रकल्पाद्वारे करण्यात येत आहे.
