कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांची देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देत प्रकल्पातील विविध उपक्रमांची पाहणी केली. भेटीदरम्यान त्यांनी शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांशी संवाद साधत केंद्रातील गाईंच्या देशी जातींबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यांनी प्रकल्पातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायी, नवीन पर्यावरण पूरक गोठे, गोबर गॅस प्रकल्प, गोपरीक्रमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांचे कौतुक केले.
प्रकल्पात उभारण्यात येत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये अद्यावत गायींचे गोठे, सायलो बंकर, बायोगॅस युनिट, कंपोस्टिंग आणि स्टोरेज युनिट्स, प्रयोगशाळा, शेतकरी वसतीगृह, प्रशिक्षण हॉल, प्रशासकीय इमारत, सेल्स काउंटर तसेच देशी गाईंच्या प्रचार प्रसारासाठी गो-पर्यटन केंद्र इत्यादी सुविधा आगामी काळात उपलब्ध होणार आहेत. या बांधकामाची पाहणी करताना कृषिमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश कांबळे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. समीर ढगे, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विविध शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.
प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी कृषिमंत्र्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर केली. कृषिमंत्री भरणे यांनी केंद्राच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा करून प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *