

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत तांभेरे आणि कणगर येथील सोयाबीन व डाळिंब प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावरील पिके अतिशय उत्कृष्ठ आहेत. विद्यापीठाने विकसीत केलेले फुले मायक्रो ग्रेड-2 आणि फुले बायोमिक्स या सूक्ष्म अन्नद्रव्य व जैविक खतांचा वापर या प्रक्षेत्रांवर झाल्यामुळे सोयाबीन फुले किमया आणि डाळिंब भगवा रोग विरहित आणि उत्कृष्ठ स्थितीत आहे. तरी सर्व शेतकर्यांनी विद्यापीठ उत्पादित बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक खते आणि जैविक बुरशीनाशके यांचा वापर करुन अधिक उत्पादन घ्यावे तसेच विद्यापीठ उत्पादित निविष्ठांना शेतकर्यांनी प्राध्यान द्यावे असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पमार्फत मौजे तांभेरे व कणगर येथे शेतकर्यांबरोबर सुसंवाद व प्रक्षेत्र भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे यानी सोयाबीन व डाळिंब उत्पादक शेतकर्याना मार्गदर्शन केले, याप्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ तसेच प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, तांभेरे गावचे प्रगतशील शेतकरी मेजर ताराचंद गागरे, किरण मगर व राहुल कोर्हाळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. ससाणे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत विद्यापीठाने विकसीत केलेले एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल या गावांसाठी आदर्शवत ठरत आहे. एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी अवलंब करावा असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी डॉ. सचिन सदाफळ व डॉ. भगवान देशमुख यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. मेजर ताराचंद गागरे यांनी फुले मायक्रो ग्रेड-2 आणि फुले बायोमिक्सचा या जैविक निविष्ठांचा पिकांवर चांगला परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी कणगर येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ गाढे आणि रावसाहेब गाढे यांच्या सोयाबीन फुले किमया या प्रक्षेत्राला भेट दिली. तसेच कल्याण गाढे यांच्या डाळिंब-भगवा या प्रक्षेत्राला भेट दिली. तांभेरे येथील मेजर ताराचंद गागरे, महेश गागरे, महेश मुसमाडे, लक्ष्मण गागरे, सोमनाथ मुसमाडे यांच्या सोयाबीन किमया या प्रात्यक्षिकांना मान्यवरांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान तांभेरे व कणगर गावचे शेतकरी उपस्थित होते. या प्रक्षेत्र भेटीचे नियोजन प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर व राहुल कोर्हाळे यांनी केले.
