श्री. ताराचंद गागरे व श्री. सतीश चौधरी हे आहेत मे व जून महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मफुकृवि आयडॉल्स या उपक्रमामध्ये मे व जून महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन श्री. ताराचंद गागरे व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन श्री. सतीश चौधरी यांची निवड झालेली आहे. श्री. ताराचंद गागरे हे मु.पो. तांभेरे, ता. राहुरी, जी.अहिल्यानगर येथील शेतकरी असून कृषि पदवीधर आयडॉल श्री. सतीश चौधरी हे मु.पो. नादुर्खी बु. ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल श्री. ताराचंद गागरे हे प्रगतशील शेतकरी असुन त्यांनी शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ विकसीत एकात्मिक शेती पध्दती तंत्रज्ञानाचा वापर व प्रसार केला आहे. त्यांनी सन 2007 ते 2012 या कालावधीत बियाणे विभाग, मफुकृवि, राहुरी यांचे मार्गदर्शनाखाली रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या दिग्विजय या वाणाचा यशस्वी ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबवून 600 क्वि. बियाणे निर्मिती करुन त्यापासून रु. 15 लाखाचे उत्पन्न मिळविले. विद्यापीठ विकसीत सोयाबीनच्या फुले संगम या वाणाचे 16 क्वि.प्रति एकर उच्चांकी उत्पादन घेतले आहे. श्री. गागरे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये सह्याद्री कृषि सन्मान पुरस्काराचा समावेश आहे. तसेच कृषि महाविद्यालय, पुणे येथून कृषिचे शिक्षण घेतलेले कृषि पदवीधर आयडॉल कृषि उद्योजक श्री. सतीश चौधरी यांनी शिर्डी येथे साई लॅण्डस्केप अॅण्ड नर्सरी सन 2004 मध्ये सुरु केली. या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी विदेशी तसेच उष्णकटीबंधीय झाडांची बाग विकसीत करणे, सरफेस व सबसरफेस सिंचन व्यवस्थापन, क्लस्टर विकास तसेच वनीकरणांचा विकास इ. कामे केली आहेत. शहरातील बागांचा कल्पकतेनुसार लागवडीचा आराखडा तयार केला आहे. तसेच विविध प्रकारच्या मोठ्या झाडांचे यशस्वीरित्या प्रत्यारोपन करण्याचे कौशल्य व तंत्र त्यांनी अवगत केले आहे. विविध प्रकारच्या लॉन, लहान व मोठ्या आकाराची शोभिवंत झाडे तसेच फुलांचे गालीचे तयार करणे या कामात ते पारंगत आहे. माझी वसुंधरा या प्रकल्पांतर्गत परिसरातील विविध गावातील वणीकरणाचा आराखडा तयार करुन लागवड करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. शहरातील विविध मंदिरे तसेच त्यांच्या परिसराचे ना नफा तत्वावर सुशोभिकरणासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या उद्योगामार्फत 15 पेक्षा जास्त व्यक्तींना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे. श्री. चौधरी यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. श्री. गागरे व श्री. चौधरी यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच इतर मफूकृवी, आयडॉल्स सर्वांना माहीत होण्यासाठी व त्यापासून विद्यार्थी शेतकरी नवीन उद्योजक यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *