
प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनी पुढे येनेचे आवाहन..
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपला प्लाझ्मा दिल्याने जर कोणाला जीवदान मिळत असेल तर त्या सारखे भाग्य नाही. तेंव्हा पात्र प्लाझ्मा दात्यांनी त्यांचा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे विनंतीवजा आवाहन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.
काल आप्पासाहेब ढुस यांच्या जीवनात पहिल्यांदा प्लाझ्मा दान करण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले की.. ,
अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या राहुरी येथील एका कोरोना रुग्णाला तातडीने B +ve प्लाझ्माची आवश्यकता असून इच्छुक दात्यांनी पुढे यावे. असा संदेश सायंकाळी ५.०० च्या जवळपास सोसिएल मेडिया वर वाचला आणि कोरोनाचे अशक्तपणामुळे झोपून असलेला मी अंथरूणावर ताटकन उठून बसलो, आणि मनात पहिला विचार आला की, आपला प्लाझ्मा दिल्याने जर कोणाला जीवदान मिळत असेल तर त्या सारखे दुसरे भाग्य नाही.! लगेच नगरला निघणेची मानसिकता तयार करून मी आवरायला सुरुवात केली व त्या मेसेज खाली दिलेल्या फोन क्रमांकावर फोन केला आणि माझा प्लाझ्मा चालेल का? ते डॉक्टर ला विचारून पहा म्हंटले. पलीकडून ज्या ताई बोलत होत्या त्यांनी होकार देऊन फोन बंद केला, लगेच राहुरीचे पत्रकार मनोज साळवे यांचा फोन आला आणि प्लाझ्मा साठी मदत करणेची विनंती केली, त्यांना मी मदतीचे आश्वासन देऊन फोन ठेवला की लगेच आर. पी. आय. चे राहुरी शहर अध्यक्ष निलेश जगधने यांनी फोन करून प्लाझ्मा मिळेल का म्हणून विचारणा केली, त्यांना होकार देऊन फोन ठेवला तर डॉ विजय मकासरे यांचा फोन आला की, मी श्रीरामपूर येथून निघतो आपल्याला प्लाझ्मा देणेसाठी जायचे आहे आवरुन ठेवा तुम्हाला घ्यायला येतो.
डॉक्टर मकासरे घरी येईपर्यंत फ्रेश होताना संगमनेर येथे संजीवन हॉस्पिटलमध्ये २६ मार्च रोजी मला कोरोना मुळे स्वतःची शेवटची घटका जवळ आल्याचा तो प्रसंग आठवला. अश्या प्रसंगी कुणाचीही साधी मदत आपला जीव वाचविण्यासाठी किती मोलाची असते हा अनुभव मी घेतला असल्याने केवळ पाच मिनिटात मी आवरुन तयार झालो. माझी फाईल घेऊन बाहेर आलोतर डॉ मकासरे मला घेण्यासाठी घरी आले होते. त्यांच्या गाडीत बसून आम्ही राहुरीला आलो, तेथून निलेश जगधने यांचेसह रुग्णाचे नातेवाईक (बहीण) आणि वाहन चालक आदी सर्व अर्ध्या तासात आम्ही नगर येथील मार्केट यार्ड मध्ये असलेल्या अर्पण ब्लड बँकेत पोहचलो.
या ब्लड बँकेत माझ्या सर्व तपासण्या करून प्लाझ्मा दान करण्यासाठी तीन तास लागणार असल्याचे सांगितले. सर्वप्रथम आपण प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र आहोत की नाही हे पाहिले जाते, त्यामध्ये कोरोना होऊन प्लाझ्मा दात्याला किमान २८ दिवस झालेले असावेत. आणि या २८ दिवसानंतर त्या दात्याला पंधरा दिवसाच्या अंतराने सलग दोन ते तीन महिने प्लाझ्मा दान करता येतो असी माहिती मिळाली. या कसोटीत मी पास झाल्यावर माझे कोरोनाचे रिपोर्ट तपासले, रक्तातील अँटी बॉडी तपासणी झाली, रक्तगट तपासणी झाली, एच. आय.व्ही. सह रक्तातील विविध घटक तपासणीला व रिपोर्ट मिळणेसाठी दीड ते दोन तास लागले. त्या नंतर रक्तदाब समतोल आहे की नाही, शरीराचे वजन समतोल आहे की नाही आदी तपासन्या झाल्या, त्यानंतर हाताच्या रक्तवाहिन्या सक्षम आहेत की नाही हे तपासले गेले व नंतर प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
रक्तातील प्लाझ्मा वेगळा करणेसाठी स्वतंत्र अशी अद्यावत यंत्रणा आहे. त्यास प्लाझ्मा साठी वापरनेत येणारे एक स्वतंत्र किट बसविले जाते व आपण रक्त देतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या हाताला सलाईन सारखी एक सुई लावून आपल्या शरीरातील रक्त त्या प्लाझ्मा किट द्वारे बाहेर किट मध्ये घेऊन त्या रक्तातील प्लाझ्मा बाजूला करून रक्त पुन्हा आपल्या शरीरात परत पाठविले जाते, या प्रक्रियेत कोणताही त्रास होत नाही हे विशेष. साधारणतः ही प्रक्रिया एक तास सुरू होती. ठराविक प्लाझ्मा वेगळा करून झाल्यावर मला त्या ठिकाणी प्लाझ्मा दान केल्याचे कार्ड आणि प्रमाणपत्र व एक ग्लास ग्लुकोज देऊन घरी जानेस परवानगी देण्यात आली.
अद्याप रात्रीचे १०.०० वाजून गेले होते, ही सर्व प्रक्रिया सुरू असताना एकीकडे आमचे सोबत असलेल्या त्या रुग्णाच्या भगिनी ची फोन वर सुरू असलेली चर्चा आणि प्लाझ्मासाठीच्या विनंत्या ऐकून जीव कासावीस होत होता. तर दुसरीकडे कोरोनामुळे सर्व हॉटेल बंद असल्याने खायला कुठेच काही उपलब्ध नव्हते, सर्वजण उपाशी होते. परतीच्या प्रवासात वाटेत एक चहा वाला उघडा सापडला आणि आम्ही सर्वांनी चहा भिस्किट घेऊन थोडा थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला. डॉ. मकासरे आणि निलेश जगधने यांनी रात्री ११.३० वाजता देवळाली प्रवरा येथे माझे निवासस्थानी मला पोहच केले. घरी आल्यावर रात्री जवळपास १२.०० वा. मी अंघोळ करून जेवण घेतले. रात्री १२ वाजता जेवण घेतले हे सांगण्याचे प्रयोजन असे की इतक्या उशिरा जेवण करूनही मला प्लाझ्मा दान केल्याने कुठलीही चक्कर किंवा इतर अशक्तपणा सारखा त्रास झाला नाही.
हे सर्व चालू असताना रात्रीच्या प्रवासात माझे फेसबुक पेजवर मी प्लाझ्मा दान करतानाचा टाकलेला फोटो पाहून देवळाली प्रवरा येथील प्रथितयश व्हेट. डॉ संदीप (पांडू) मुसमाडे यांनी व राहुरीचे पत्रकार अनिल कोळसे यांनी फोन करून प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली व त्याबद्दल माझेकडून माहिती घेतली.
कोरोना होऊन एक महिना उलटलेल्या नागरिकांनी डॉ. संदीप मुसमाडे व अनिल कोळसे यांचा आदर्श घेऊन प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वेच्छेने पुढे यावे व आपला प्लाझ्मा दान करून एक जिव वाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आप्पासाहेब ढुस यांनी केले आहे.
