कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेवून आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केल्यामुळे असंख्य कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळाला असून उपचारासाठी दाखल झालेले बांधित रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच योगसाधनेचे धडे देवून रोज शेकडो रुग्ण उपचार घेवून आनंदाने आपल्या घरी जात आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रोज बाधित रुग्णांचा आकडा जरी मोठा असला तरी बाधित रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटर हक्काचे आरोग्य केंद्र बनले आहे.
मागील वर्षी आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत प्रभावी असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे दररोज शेकडो बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मागील वर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविता आले होते. मात्र यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप पाहता सतर्क होवून आमदार आशुतोष काळे यांनी वेळीच पाऊल उचलून ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतीगृहात २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केल्यामुळे बाधित रुग्णांना येत असलेली अडचण दूर करून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे ३० ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड सेंटर सुरु केले. मात्र यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतीगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे. जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहे. ज्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना प्राथमिक स्वरुपात ऑक्सिजन देखील उपलब्ध करून दिला जात आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना रोज सकाळी नाश्ता सकाळ संध्याकाळ दोन वेळेस चहा व रुचकर जेवण दिले जात असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जम्बो कोविड केअर सेंटर शेजारीच श्री साईबाबा तपोभूमी असल्यामुळे सकाळ संध्याकाळ कानावर पडत असलेल्या साईंबाबांच्या आरतीचे स्वर बाधित रुग्णांसाठी आशीर्वाद ठरत असून त्यामुळे रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेवून बरे होत आहेत.
सध्या या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला व पुरुष स्वतंत्र उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण बाधित आढळून येत आहेत. रुग्णवाढ थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे येत्या काही दिवसात जरी बाधित रुग्णांची संख्या वाढली तरी आमदार आशुतोष काळे यांनी १०० बेडची तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेची दाहकता जरी जास्त असली तरी १०० ऑक्सिजन बेडचे सुरु होणारे कोविड केअर सेंटर व करण्यात आलेली पूर्वतयारी पाहता सर्वसामान्य बाधित नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.
चौकट :- मी हृदयाच्या आजारावर उपचार घेवून पुढील उपचारासाठी शासकीय योजनेच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी एका हॉस्पिटलला गेले असता त्याठिकाणी दुर्दैवाने माझा प्राथमिक कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. अचानकपणे समोर उभ्या टाकलेल्या संकटामुळे मला व माझ्या कुटुंबाला काय करावे तेच सुचेना. अनेक हॉस्पिटलला चौकशी केली मात्र जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा मी आमदार आशुतोष काळे यांनी सुरु केलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. या ठिकाणी मिळत असलेल्या सोयी सुविधा अत्यंत चांगल्या असून येथे मिळालेल्या उपचारातून मी पूर्णपणे बरी झाली आहे. जीवघेण्या संकटकाळात हे जम्बो कोविड केअर सेंटर माझ्यासाठी वरदान ठरले त्यामुळेच मी आज माझ्या कुटुंबासोबत आहे अशी भावनिक प्रतिक्रिया उपचार घेवून पूर्णपणे बऱ्या झालेल्या महिलेने दिली आहे.

फोटो ओळ:- १) जम्बो कोविड सेंटरच्या प्रांगणात योगसाधनेचे धडे घेतांना बाधित रुग्ण.

फोटो ओळ:- २) रुग्णांचा वाढता आलेख पाहता आशुतोष काळे यांनी केलेली १०० बेडची तयारी.
