


कोपरगाव प्रतिनिधी:- वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामेश्वर विद्यालयाच्या वतीने वृक्षसंवर्धन जनजागृती साठी कामिका एकादशीचे औचित्य साधत वृक्ष दिंडी व वारकरी पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. .


तिर्थक्षेत्र पुणतांबा या ठिकाणी जाण्याकरिता कामिका एकादशीला नाशिक संभाजीनगर तसेच जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या अनेक दिंडी वारी मार्गे जातात आषाढी एकादशीला जेवढे महत्त्व पंढरपूरच्या वारीला असते तेवढेच महत्त्व कामिका एकादशीला पुणतांबा या ठिकाणच्या वारीला असते त्यामुळेच वारी गावचा परिसर यादरम्यान वारकऱ्यांच्या येण्याने भक्तिमय होत असतो
प्रतिवर्षाप्रमाणे रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला दिंडीत झांज पथक,नृत्य फुगडया खेळत बालगोपालांसह शिक्षक व ग्रामस्थानीही आनंद घेतला

सहावीचा विद्यार्थी अथर्व संजय कर्पे याने विठ्ठल तर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु.ईश्वरी अशोक कानडे हिने रखुमाई हुबेहुब सादर करून सर्वांचे लक्ष वेधले गावातील प्रत्येक गल्लीत महिला भाविकांनी या विठ्ठल रखुमाईचे ठिकठिकाणी पूजन केले इयत्ता नववीतील विद्यार्थी सार्थक रणजित खैरनार याने ज्ञानेश्वर माऊली तर साई विजय पवार व साई संतोष गायकवाड याने भालदार चोपदार तुकाराम महाराज तसेच अनेक विद्यार्थी वारकरी वेशात असल्याने तेही दिंडीचे आकर्षण ठरले

विद्यार्थ्यांनी अभंग तसेच भक्तीगीतांवर नृत्य सादर केले भक्ती बरोबरच पर्यावरण संवेदनशीलता जपण्यासाठी गावात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी त्या त्या कुटुंबावर देण्यात आली

वारीचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला ग्रामपंचायत वारीच्या वतीने विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीतून वृक्षारोपणाचा संदेश यानिमित्ताने दारोदारी पोहोचवला.
शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रामेश्वर विद्यालयात यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. या वृक्षदिंडी व पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ पालक यांनी सहभाग नोंदवला
शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतच बाहेगावाहून आलेल्या दिंडीतील वारकरी देखील सहभागी होऊन त्यांनी रिंगण सोहळा घेतला. अभंग व भक्तीगीत गावून दिंडीचा आनंद घेतला. त्यात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेचे पदाधिकारी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ या सर्वांनी सहभाग घेतला. या वृक्षदिंडी व पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन व तयारी करून घेण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका सौ शालिनी कर्पे व सौ आशा निळे ,पालक पुनम मोहरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
