
कोपरगाव प्रतिनिधी:-
“जो पर्यंत आपण स्वतः हा मनावर घेत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा –हास थांबणार नाही. आता आपण पोथ्यांची पूजा करण्याऐवजी अॅड. संजीव कुलकर्णी लिखित The Earth: Beginning of the End या पर्यावरणाशी संबंधित अभ्यासपूर्ण ग्रंथाचे वाचन व पूजा करण्याची गरज आहे. सध्या पर्यावरणाचा –हास इतक्या प्रचंड प्रमाणात झालेले आहे कि, त्यापाठीमागे कुठे तरी मोठे अर्थकारण व राजकारण होते की काय अशी शंका एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटते. अॅड. संजीव कुलकर्णी यांचा हा ग्रंथ भविष्यात समाज स्वास्थ्यासाठी कामधेनू ठरावा अशी शुभेच्छा मी देतो.” असे प्रतिपादन मा. जिल्हा न्यायाधीश- वर्ग १ एस. बी. कोऱ्हाळे यांनी येथे केले. स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयात The Earth: Beginning of the End या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या ग्रंथ-प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी को.ता.एज्यु.सोसाटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व जिल्हा न्यायाधीश- वर्ग २ बी.एम. पाटील तसेच प्रो ( डॉ.) प्रवीण सप्तर्षी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी ग्रंथासंबंधी आपले मनोगत व्यक्त करतांना अपेक्षा व्यक्त केली की, “अॅड. संजीव कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठीत अनुवादित होऊन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा.”
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, “ज्यावेळी हत्तींच्या वनातून हत्तींना हाकलून कुंभमेळ्यासाठी जागा द्या असे आव्हान केले जाते. तेव्हा आमच्यातील पर्यावरणप्रेमींना प्रचंड दुःख होते. अशा प्रकारे अनेक वने व गायराने लुटून आपण गरीब शेतकऱ्यांच्या डेअऱ्या तोट्यात आणि पिशवीत दूध घालून विकणारे कारखाने करोडोत अशी दयनीय परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे अॅड. संजीव कुलकर्णी यांनी दिवसेंदिवस होत जाणाऱ्या पर्यावरण-विनाशाच्या चिंतेतून तसेच त्याच्या संरक्षणाच्या कटिबध्दतेतून हा ग्रंथ लिहिला व त्याच्या विक्रीतून येणारा निधी महाविद्यालयातील गरीब विध्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरला जाणार असल्याचे ऐकून खूप बरे वाटले. त्यामुळे मा. जज मंडळींनी देखील हा ग्रंथ वाचावा जेणेकरून पर्यावरणासाठी लिहीणा-या व झटणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असे मनोमन वाटते.” यावेळी लेफ्ट. कर्नल नरैन दास म्हणाले की, “मी एक सैनिक असून मला वाचनाचाही छंद आहे. त्यामुळे मी अॅड. संजीव कुलकर्णी यांचा The Earth: Beginning of the End हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला तेव्हा मला जाणवले की हे पर्यावरनाशी संबंधित केवळ एक चिंतनच नसून ते एक उत्तम संशोधन देखील आहे. हा संशोधनात्मक ग्रंथ संपूर्ण मानवी जीवनात बदल घडवू शकतो आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांचा नाश करू शकतो.” जिल्हा न्यायाधीश- वर्ग २ बी.एम. पाटील म्हणाले की, कोरोनाचे अनेक तोटे सांगितले जातात. परंतु कोरोना काळातील लॉकडाऊन मधून असा सुंदर ग्रंथ लिहिला जाऊ शकतो. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे . मी अॅड. संजीव कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो. याप्रसंगी आपल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना लेखक अॅड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, “माझ्यासाठी या ग्रंथ लेखनाची प्रेरणा अधिक महत्वाची आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेले जनजीवन व दिवसरात्र घरात बसून टीव्हीवरील त्याच त्या रुग्ण संख्या वाढीच्या व मृत्यूच्या बातम्या ऐकून मन विषण्ण होत असे. तेव्हा लिखाणाची इच्छा निर्माण झाली. ” या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या विकासाची माहिती दिली. पाहुण्यांचा व ग्रंथाचा परिचय प्रा. डॉ. विजय ठाणगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले व आभार-प्रदर्शन संस्थेचे विश्वत संदीप रोहमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचा वार्षिक अंक गोदातरंग (भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेष अंक) चे प्रकाशन व विज्ञान मंडळाचे उदघाटन पाहुणचा हस्ते करण्यात आले. यशस्वी करण्यासाठी अॅड. प्रेरणा पटनी, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रोफेसर डॉ. जे.एस. मोरे आदींनी परिश्रम घेतले.
