
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना आजारावर रुग्णाला प्रभावी ठरणारे ‘रेमिडीसीविर’ इंजेक्शनची विक्री मेडिकल तथा एजन्सी मार्फत सुरू आहे. मात्र ह्या इंजेक्शनची वाढती मागणी बघता बऱ्याच फार्मसी द्वारे रेमीडीसिवीरचा काळा बाजार केला जात आहे. रुग्णांची होत असलेली लूट ही पूर्णपणे चुकीची असून अश्या प्रकारची थेट विक्री बंद करून प्रशासकीय यंत्रणे द्वारेच करण्यात यावी अशा आशयाची मागणी तथा निवेदन जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तुषार पोटे यांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याकडे केली आहे. सध्या देशभर कोरोना ची दुसरी लाट थैमान घालत आहे, कोरोना रुग्णांचे नातेवाईक तथा घरचे मंडळी यांची रेमेडिसीविर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी जात असताना प्रचंड लूट होते तसेच त्यांना मानसिक त्रास व मेडिकल, एजन्सी द्वारे होणाऱ्या पिळवणुकीस सामोरे जावे लागते हे अन्यायकारक आहे. सर्वच औषध विक्रेते वाईट नाहीत पण काही लोक या परिस्थितीचा फायदा घेत या इंजेक्शनचा पुरवठा दाबून ठेवण्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे. शासनाने गांभीर्याने याचा पुरवठा करत आरोग्य विभागा मार्फत यावर काम करण्यात यावे असे पोटे यांनी सदरील निवेदनात सांगितले आहे. उपरोक्त निवेदनाच्या प्रति सर्व वृत्तपत्रे तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आल्या आहेत.
