Uncategorized

विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच शाळेची खरी ओळख:- आमदार आशुतोष काळे…

गुलाब पुष्प देत आमदार आशुतोष काळेंनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून या टप्प्यात मिळालेले शिक्षण आणि संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करावी. कोणत्याही शाळेची ओळख केवळ भव्य इमारती, आधुनिक सुविधा किंवा शिक्षकांच्या संख्येवरून होत नसते तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच त्या शाळेची खरी ओळख असते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळपेवाडी येथे नवीन विद्यार्थ्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी शिक्षक, पालक विद्यार्थ्यांशी, संवाद साधला.याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यशस्वी आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी ज्ञानार्जनाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या निरागस चिमुकल्यांसाठी शाळेचा पहिला दिवस हे पहिले महत्त्वाचे पाऊल असते.हा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतो.या दिवसापासूनच ज्ञान, संस्कार आणि यशाच्या प्रवासाला सुरुवात होत असते. आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक झाला पाहिजे ह्या दृष्टीकोनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावे. शिष्यवृत्ती परीक्षा ही शाळेच्या बौद्धिक गुणवत्तेचे मोजमाप करणारी कसोटी असते. शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा आणि उपक्रमांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश यावरून शाळेची गुणवत्ता अधोरेखित होवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच शाळेची प्रतिष्ठा वाढत असते.कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा पट टिकून आहे हि अभिमानास्पद बाब असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक भौतिक गोष्टींना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचेही वाटप करण्यात आले तसेच शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक सोनवणे यांनी शाळेला दिलेला प्रिंटर आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्द करण्यात आला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक शकील पटेल, सरपंच सौ.चंद्रकलाताई कोळपे, सागर कोळपे, आदिनाथ कोळपे, अनिल कोळपे, महेश कोळपे, नंदकिशोर कोळपे, केंद्र प्रमुख पंडोरे, ग्रामविकास अधिकारी सय्यद तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :- आपण सर्व मराठी भाषा बोलतो हे आपले भाग्य आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. आजच्या आधुनिक युगात दैनंदिन व्यवहारात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर होत असला, तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगून मराठी भाषेला प्राधान्य देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठीचा अभिमानाने वापर करणे हेच भाषेचे खरे संवर्धन आहे.-आमदार आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *