कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यात व कोकणात मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी कोपरगाव बागायतदार सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार रुपयांची केलेली मदत आदर्शवत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांनी जमा केलेला कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यात व कोकणातील पूरग्रस्तांना ११ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आ. आशुतोष काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा आदि जिल्ह्यात व कोकणात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. त्या महापुराचा फटका नागरिकांना बसला होता व मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होऊन तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शासनाच्या वतीने सर्वोतोपरी उपाययोजना करून मदत देण्यात आली होती. मात्र सामाजिक बांधिलकी जोपासत कोपरगाव बागायतदार सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांनी दिलेली मदत कौतुकास्पद असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी माळी बोर्डिंगसाठी १० लाख रुपये निधी दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा सोसायटीचे चेअरमन पद्माकांत कुदळे, व्हा.चेअरमन नरेंद्र गिरमे, सदाशिव रासकर, अनिल शेवते, सुरेश देवकर, कैलास देवकर, विजय टिळेकर, शिवाजी शिंदे,दिनार कुदळे, माळी बोर्डिंगचे अध्यक्ष अनिल पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ :- पूरग्रस्तांना ११ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीआ. आशुतोष काळे यांच्याकडे सुपूर्द करतांना सोसायटीचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे, व्हा.चेअरमन नरेंद्र गिरमे आदी.
