लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सैनिकांचे महत्त्वपुर्ण योगदान:- उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर…

Uncategorized

कोपरगांवात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर यांनी आज येथे केले.
महसूल सप्ताहानिमित्त कोपरगांव तालुक्यातील माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सैनिकांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन करताना श्री.आहेर बोलत होते. याप्रसंगी कोपरगांव तहसीलदार संदिपकुमार भोसले, वीर पत्नी मंगला वलटे, सरला जाधव, अपर तहसीलदार विकास गंबरे, निवासी नायब तहसीलदार आशिष खोमणे,‌‌ सुभेदार धन्यकुमार सरवदे, मेजर यमाजी चेडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, सचिव भाऊसाहेब निंबाळकर,‌महाराष्ट्र शासनाचे वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके,‌ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे, आपदा सहाय्यक संदिप खिरे, सैनिक मित्र अशोक धुमाळ, आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.


‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले/ प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्ज तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्ज, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना घरासाठी / शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे ,संरक्षण दलातील कर्मचा- यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली.
महसूल सप्ताह आणि अमृत जवान योजना अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील माजी सैनिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. या प्रसंगी माजी सैनिक आर. बी. तथा अप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान वतीने फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित प्रत्येक माजी सैनिकांना गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत तहसीलदार संदिपकुमार भोसले तर सूत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले. तर आभार निवासी नायब तहसीलदार आशिष खोमणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *