

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या वतीने राज्याचे कौशल्य विकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार सबंध राज्यभरात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस नवी दिशा व रोजगाराच्या विविध संधीची माहिती मिळावी या अनुषंगाने राज्याच्या विविध भागात मार्गदर्शन शिबिरे राबवले जात असून त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन हॉलमध्ये शुक्रवार दि ९ जून रोजी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी प्रदर्शन मध्ये राज्याचे कौशल्य विकास मंत्रालयाचे समन्वयक योगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर येथील डॉ अनिल जाधव इमरीचर सेटरचे संस्थापक डॉ अनिल जाधव, संभाजीनगर येथील पिनॅकल इंग्लिश करियर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रा ॲड राहुल नावंदकर, आर्म्स इंकॉर्पोरेशनचे संचालक किरण धोंगडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अभिषेक कुमार, शेतकी अधिकारी प्रशांत मानवतकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयएमसी सभासद अभिजित पाटील, निमंत्रित सदस्य तथा संजीवनी शैक्षणिक संस्थेचे रजिस्टार योगेश पवार, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रचार्य एस के जाधव, लासनकर क्लासेसचे प्रा लासनकर, चक्रधर स्वामी आयटीआय कॉलेजचे प्रा गाढवे, सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धारणगावकर यांच्या सह शिक्षण बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मान्यवर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था व श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ट्रेनिंग इन्चार्ज एस एम कुलकर्णी यांनी करताना शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे महत्व सांगत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.तर उपस्थित मान्यवरांचा परिचय संस्थेचे गट निदेशक बी.पी शिंदे यांनी करून दिला तर विद्यार्थिनीच्या स्वागत गीताने व छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली
याप्रसंगी संभाजीनगर येथील डॉ अनिल जाधव यांनी व्यावसायिक शिक्षणाचे महत्व सांगत व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यातील नोकरीच्या संधी या विषयी तर प्रा राहुल नावंदकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने प्रमुख मुद्द्यांचे विस्तृतपणे मुलांना समजेल अशा भाषेत विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश जोशी यांनी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपले करिअर घडवताना आपले कॅरेक्टर देखील तितकेच सांभाळायला हवे व त्यासोबतच ज्यांनी आपले करिअर घडवण्यात मोलाचे योगदान दिले असे आपले आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांना कधीही विसरू नये असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना देत सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शासनाचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभाग हे सदैव विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सिद्धेश भोईर यांनी तर उपस्थितांचे आभार गटनिदेशक बी पी शिंदे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
