
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील काकडी या गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत काकडी ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी हक्काची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. विमानतळ प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतचे सुमारे ६ कोटी १६ लाख २९ हजार ७७६ रुपये थकले आहेत. ही थकीत रक्कम ग्रामपंचायतला त्वरित देण्यात यावी आणि गावातील विविध विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन रविवारी (२६ मार्च) शिर्डी दौऱ्यावर आले होते. ना. गिरीश महाजन यांचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. काकडी गावातील विविध प्रश्नांबाबत तसेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतची कराची थकलेली रक्कम तातडीने देण्यासंदर्भात स्नेहलताताई कोल्हे यांनी ना.गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी काकडीच्या सरपंच पूर्वा गुंजाळ, कानिफ गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, विजय डांगे, राजेंद्र भालेराव, बाबासाहेब सोनवणे, सतीश डांगे, विजय मच्छिंद्र डांगे, दत्तात्रय गुंजाळ, संजय सोनवणे, चंद्रकांत डांगे, संपत डांगे, भीमराज गुंजाळ, इंद्रभान गुंजाळ, ग्रामसेवक कार्ले यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी सन २०१७ मध्ये कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. या विमानतळासाठी २००६ साली भूसंपादन सुरू झाल्यानंतर काकडी ग्रामस्थांनी अत्यल्प मोबदल्यात १५०० एकर जमीन दिली. यावेळी स्थानिकांना नोकरीसह गावातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. मात्र, पंधरा वर्षे उलटूनही ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. काकडी गावात अजूनही शाळा नाही. रस्ते नाहीत. पथदिवे नाहीत. त्यातच विमानतळ प्राधिकरणाकडे काकडी ग्रामपंचायतचा कर मोठ्या प्रमाणात थकला आहे.
२०१७ मध्ये काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानसेवा सुरू केल्यापासून मागील सहा वर्षांत काकडी ग्रामपंचायतला मालमत्ता व इतर विविध कराच्या स्वरूपात मिळणारी हक्काची रक्कम अदा केलेली नाही. ही थकीत रक्कम वाढत जाऊन आजघडीला सुमारे ६ कोटी १६ लाख रुपये इतकी रक्कम विमानतळ प्राधिकरणाकडे थकली आहे. शिर्डी विमानतळाकडे थकीत असलेली कराची रक्कम त्वरित अदा करण्याबाबत ग्रामपंचायतने वारंवार मागणी केली.यापूर्वी बऱ्याच वेळा विमान प्राधिकरणाला नोटिसाही दिल्या आहेत. तरीही विमानतळ प्राधिकरणाकडून ही थकबाकी देण्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. विमानतळ प्राधिकरणाकडून ग्रामपंचायतच्या कराची थकबाकी दिली जात नसल्यामुळे काकडी गावच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
जिल्हाधिकारी, अहमदनगर व गटविकास अधिकारी,कोपरगाव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम १६९० मधील नियम ‘बी’ नुसार सरकारच्या मालकीच्या जमिनी व इमारतींना करमाफी अनुज्ञेय नाही. तसेच राष्ट्रीय पुनर्वसन धोरण २००७ मधील तरतुदीनुसार २६ नागरी सुविधा देय आहेत. त्यानुसार काकडी गावासाठी विविध विकासकामे तसेच पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र, अद्यापही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने काकडी गावात विकासकामे केलेली नाहीत. काकडी ग्रामपंचायत कराची सन २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ ची ६ कोटी १६ लाख २९ हजार ७७६ रुपये एवढी रक्कम विमानतळ विकास कंपनीकडे थकीत आहे. ही थकबाकी देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. विमानतळ विकास कंपनीकडे थकीत असलेली ग्रामपंचायतची कराची रक्कम तातडीने भरणा करण्याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.
तसेच काकडी-मल्हारवाडी येथे रस्ते, प्राथमिक शाळा खोल्या आदी सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. काकडी येथील गुंजाळ वस्ती (लवण रस्ता) कडे जाणाऱ्या ७ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करणे, काकडी ते वेस (मल्हारवाडी मार्गे) या ३ कि.मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, काकडी ते मनेगाव रस्ता (३ कि.मी.) डांबरीकरण करणे ही कामे तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण संबंधितांना तसे निर्देश देऊन कार्यवाही करावी, अशी मागणीही कोल्हे यांनी महाजन यांना केली. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिलेले निवेदन व मागण्यांवर तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. महाजन यांनी दिले.
