शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठविलेल्या २४ विकासकामांसाठीच्या प्रस्तावाला ०४ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीस राज्य शासनाची मंजूरी…

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश….
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील २४ विविध विकासकामांसाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लोकसभा सदस्य भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ३० टक्के प्रमाणे १ कोटी ३० लाख ८० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक साजियो-२०२६/प्र.क्र.९२५(१)/अजाक अन्वये २ कोटी ३८ लाख रुपयांच्या १५ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अकोले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भवन विस्तारीकरण, कोपरगाव तालुक्यातील धामोरी व श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे संविधान भवन बांधकाम या प्रत्येकी ३० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवन बांधकामासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण, करंजी येथील संत रविदास महाराज मंदिर सभामंडप, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्था प्रांगणातील सभामंडप, खंदरमाळी गावठाण अंतर्गत संत रोहिदास महाराज मंदिरासमोरील सभामंडप, आश्वी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहास संरक्षक भिंत व सुशोभीकरण, श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप तसेच जळके खुर्द येथील आंबेडकर नगर दलित वस्ती सभामंडप या कामांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राहुरी तालुक्यातील करजगाव येथील दलित वस्ती स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, तर करजगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आणि श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील मातंग समाज अमरधाम येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचप्रमाणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक साजियो-२०२६/प्र.क्र.९२५/अजाक अन्वये २ कोटी रुपयांच्या ९ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अकोले नगरपंचायत, संगमनेर नगरपरिषद, कोपरगाव नगरपरिषद, श्रीरामपूर नगरपरिषद, देवळाली नगरपरिषद, नेवासा नगरपंचायत व राहता नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील दलित वस्तीत समाजमंदिर बांधण्यासाठी १५ लाख रुपये, तर जेऊर कुंभारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,अशी माहिती खासदार वाकचौरे यांनी यावेळी दिली तसेच यावेळी खासदार वाकचौरे यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री.संजय शिरसाठ साहेब यांचे विशेषत्वाने आभार मानले.
