

कोपरगाव प्रतिनिधी:-
मंगळवार (दि. ०२) रोजी कोपरगाव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत मुलांच्या विविध गटात तालुक्यातील सुमारे साठ संघांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत सुरेगाव-कोळपेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १४ व १९ वर्ष वयोगटातील कबड्डी संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून संपूर्ण स्पर्धेवर आपला वरचष्मा ठेवला. सर्वच सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करून सांघिक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात केली. १९ वर्षे वयोगटातील अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने संजीवनी कनिष्ठ महाविदयालय , कोपरगाव संघावर सहा गुणांनी विजय मिळविला. १९ वर्षे संघाकडून प्रेरणा मिळवून कामगिरीतील सातत्य ठेवत १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले .

अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत मोठी पिछाडी भरून काढत जिल्हा परिषद बहादरपूर संघाचा तीन गुणांनी पराभव केला . आणि जिल्हास्तरीय स्पर्धेचे कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा सन्मान या १४ वर्षे व १९ वर्षे या दोनहीं संघांनी मिळविला. तसेच कुस्ती खेळामध्ये १७ वर्षे वयोगटात गटात चैतन्य खाडे या विद्यार्थ्यांचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून त्याची अहिल्यानगर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे प्राचार्य प्रकाश चौरे यांनी सांगितले.
कबड्डी संघाच्या खेळाडूंनी व कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांचे माजी आमदार अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोषदादा काळे साहेब , स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य, पालक शिक्षक संघ अध्यक्ष व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, उपमुख्याध्यापक देविदास माने व पर्यवेक्षक सच्चिदानंद झावरे , सुदाम घोटेकर , आप्पासाहेब आगवन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक व विद्यार्थी यांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल वसावे, प्रा. बाबासाहेब आभाळे , कबड्डी मार्गदर्शक देवेंद्र भोये, नितीन निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धावेळी तालुक्यातील विविध शाळांतील शिक्षक वर्गाचे देखील मार्गदर्शन लाभले .
