
कोपरगांव प्रतिनिधी:-
संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा कार्यक्रम नुकताच पार पडला. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, माजी केंद्र प्रमुख दिलीपराव ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीतानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज सदाफळ यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मान्यवरांचा सत्कार केला. मार्गदर्शन करताना श्री परजणे पाटील यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी भयमुक्त रहाणे गरजेचे आहे. कोणतेही दडपण न आणता कॉपीमुक्त परीक्षा देण्याची वृत्ती अंगीकरली पाहिजे असे सांगून त्यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्रीमती शबाना शेख यांनी परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन आणि अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तर केंद्र प्रमुख दिलीपराव ढेपले यांनी शिक्षणाचे व परीक्षेचे महत्व पटवून दिले. विद्यार्थीनी पायल गायकवाड, प्रियंका कोतकर, साक्षी जामदार, रुपाली भवर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक कदम, प्रा. लक्ष्मण पुलाटे, प्रा. नानासाहेब माने. प्रा. जाकीर पठाण, प्रा. अनिल दरवडे, प्रा. नीता कोताडे, प्रा. अमोल परजणे, प्रा. रुपाली आहेर, प्रा. ज्ञानेश्वर गागरे, प्रा. किशोर करपे, प्रा. सुयोग चिंधे, निलेश शिंदे, सौरभ नळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु. गायत्री खटकाळे व रेणुका कोल्हे यांनी केले तर प्रा. दीपक कदम यांनी आभार व्यक्त केले.
