
कोपरगाव प्रतिनिधी:-
गेली साडेचार वर्ष कोपरगाव नगरपालिकेमध्ये कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर विकासकामांना सातत्याने पाठींबा दिला आहे, परंतु चुकीचे अंदाजपञक केले म्हणून बहुमताच्याच जोरावर भ्रष्टाचार रोखण्याचे काम केले आहे. हे जेवढया पोटतिडकीने विरोधक मांडत होते, मग आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सन 2021-22 च्या वित्तीय अंदाजपत्रकालाही कोल्हे गटाने बहुमताने मंजुरी दिली हेही सांगण्याचे धाडसही करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केले.
नगराध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नेहमी भाजपा शिवसेना युतीच्या नगरसेवकांवर आरोप करतात. बहुमताच्या जोरावर नगरपालिकेमध्ये विकासकामांना विरोध करतात,असा डांगोरा पिटतात. परंतु गेली साडेचार वर्षही पालिकेमध्ये कोल्हे गटाचे बहुमत आहे. मग आजपर्यंत झालेल्या विकासकामांना मंजुरी देण्याचे काम केलेले आहे. कधीही विकासाला विरोध केला नाही, परंतु नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील काही विकासकामांचे अंदाजपत्रके चुकीची केली गेली, सदरच्या विकासकामांना आमचा विरोध नव्हता,आजही नाही, फक्त या चुकीच्या इस्टीमेटची दुरूस्ती करून अंदाजपञक करण्याची आमची मागणी होती, ही मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली नाही, त्यामुळे यामधुन त्यांचा मोठा भ्रष्टाचार करण्याचा डाव आम्ही बहुमताने हाणुन पाडला. ही वस्तुस्थिती माहित असुनही नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गावभर आकाडतांडव केले, पत्रके वाटुन जनतेमध्ये दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला, पत्रकार परिपदा,सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोल्हे गटाला बदनाम करण्याचे षडयंत्र चालविले. मग आजच्या सर्वसाधारण सभेतील सन 2021-22 च्या वित्तीय अंदाजपत्रक मांडले गेले असतांना त्याच कोल्हे गटाने बहुमत असुनही विरोध केला नाही, तर बहुमताने या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. हे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गावभर सांगण्याचे धाडस करावे,असे आवाहन श्री निखाडे यांनी केले.
