
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणुकांच्या मतदानाचे निकष देखील वेगळे असतात. गावपातळीवरील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तर शक्यतो त्या-त्या सोसायटीचे सत्ताधारी गट सोसायटीची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवत असतात.त्यामुळे सोसायटीच्या निवडणुकात सत्ताबदल होणे ही गोष्ट तशी अशक्यप्रायच असते हे सहकारातील जाणकार व्यक्ती जाणून आहेत.मात्र काळे गटाने ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत १ वर्षापूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यापासून तब्बल पाच सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धूळ चारत आपला झेंडा रोवला आहे.शनिवार (दि.११) रोजी पार पडलेल्या वेळापूर सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाला धूळ चारून सर्वच्या सर्व १३ जागा काळे गटाने जिंकून आपला हिसका दाखवत कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात आणली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील अनेक वर्षापासून वेळापूर सोसायटीवर कोल्हे गटाची एकहाती सत्ता होती. माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल उभा करून सत्ताधारी कोल्हे गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते. काळे गटाने कोल्हे गटाचे सर्व मनसुबे उधळून लावत सभासदांना सत्ता परिवर्तनाचे आवाहन केले होते त्या आवाहनाला सोसायटीच्या सुज्ञ सभासदांनी प्रतिसाद देऊन वेळापूर सोसायटीमध्ये कोल्हे गटाला पायउतार करून पाचवे सत्ता परिवर्तन करीत वेळापूर सोसायटीची सत्ता काळे गटाच्या ताब्यात दिली आहे.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे दिपक रामदास पाटोळे, राजेंद्र खंडेराव गुजर, नवनाथ धोंडीराम गोरे, सोपान रंगनाथ जाधव, अशोक सखाहारी भगत, जयवंत दत्तात्रय मंडलिक, अमोल सुनील वैराळ, सुनील श्रीपत वैराळ, बाळू गणपत पगारे, सौ. परीगाबाई तुकाराम खोडके, सौ.मंगल भाऊसाहेब गोरे, विजय दत्तात्रय आहेर, बाळासाहेब लक्ष्मण शिंदे या विजयी उमेदवारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत रतनराव कदम, दगुनाना गोरे, वसंतराव वैराळ, दिलीप वैराळ, देवराम वैराळ, अशोक आहेर आदींसह काळे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून परिश्रम घेत या निवडणुकीत कोल्हे गटाला धोबीपछाड देत ५ वे सत्तांतर घडवले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे व निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोकराव काळे, श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र जोशी यांनी काम पाहिले सचिव संजय दिघे यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.
चौकट :- कोपरगाव तालुक्याचे काळे-कोल्हेंचे राजकारण उभ्या महाराष्ट्राला माहीत असून सहकारातील आपापले गड त्यांनी नेहमीच राखले आहेत.स्व.शंकररावजी काळे व स्व. शंकररावजी कोल्हे यांच्यानंतर माजी आमदार अशोकराव काळे व संजीवनीचे चेअरमन बिपिनराव कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष देखील सर्वश्रुत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत आशुतोष काळेंना पराभव स्वीकारावा लागला. २०१९ ला देखील मोदी लाट होतीच मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळवून विरोधकांना सव्याज परतफेड केली. २०२१ ची जिल्हा बँकेची सार्वत्रिक निवडणुक पार पडल्यानंतर काळे परिवाराचा राजकीय वारसा पुढे चालवतांना ना. आशुतोष काळे यांनी आपल्या सर्व सहकारी सोसायट्या विरोधकांच्या ताब्यात जावू न देता .विरोधकांच्या ताब्यातील सोसायट्या मिळविण्यासाठी कडवा संघर्ष करून वेळापूर सोसायटीच्या रूपाने विरोधकांच्या ताब्यातील ५ वी सोसायटी आपल्या ताब्यात घेतली हा कोपरगाव तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
