
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील अभ्यासाच्या जोरावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर सतत साखर उद्योग त्यावर अवलंबुन असणारे छोटे मोठे घटक, कामगार आणि बाजारपेठेचा विचार करून नॅशनल हेवि इंजिनियरींग संस्थेची स्थापना करून त्यातून साखर उद्योगाची मशिनरी तयार केली अशा विकासात्मक कल्पक खाणीचा झरा आता अटला आहे अशा शब्दात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर सोहळा समितीचे प्रमुख ह. भ. प. मनोहर ढमाले यांनी श्रध्दांजली वाहिली.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांचे हयातीत तुकाराम गाथेचा ध्यासपुर्ण अभ्यास केला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नॅशनल हेवी इंजिनियरींग संस्थेचे माजी कर्मचारी व डाउच (कोपरगांव), तळेगांव दाभाडे, मावळ (पुणे), येथील वारकरी यांनी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे तुकाराम गाथा, गाणगापुर येथे गुरूचरित्र पारायण, अक्कलकोट तुळजापूर येथे धार्मिक सेवा दिली त्याप्रसंगी ते बोलत होते.
ह. भ. प. मनोहर ढमाले पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे ज्ञान अफाट होते, या ज्ञानाच्या मार्गदर्शनावर त्यांची पुढची पिढी मार्गक्रमण करत आहे. कै. कोल्हे यांनी जपान, जर्मनी, श्रीलंका, थायलंड, ब्राझील, युगांडा, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, अमेरिका, मॉरेशिएस, मोरोक्को इत्यादी विकसीत विकसनशील देशातील शिष्टमंडळांशी कित्येकवेळा संवाद साधुन त्यांना सहकारी तत्वावरील नॅशनल हेवी इंजिनियरींग संस्थेत तयार होणा-या साखर उद्योगाच्या स्वदेशी तंत्रज्ञान मशिनरीची माहिती देवुन त्याबाबत असंख्य देशाबरोबर तंत्रज्ञान निर्यातीचे करार करून ते यशस्वी करून दाखविले. शेतीला जोडधंदा असावा म्हणून त्यांनी दुग्धोत्पादनाला प्राधान्य दिले त्याचप्रमाणे साखर उद्योगाला जोडधंदा रासायनीक उपपदार्थ, सहवीज निर्मीती, बायोगॅस, इथेनॉल, औषधनिर्मीती आदि तंत्रज्ञानाची विदेशी जात माहिती मिळविली अभ्यास केला आणि संजीवनीत त्याची यशस्वी उभारणी करून देश व राज्यपातळीवरील साखर कारखानदारीत निरनिराळे प्रयोग करून हे सर्व प्रकल्प यशस्वी करून दाखविले, साखर निर्यातीतुन त्यांनी तत्कालीन समितीवर काम करतांना भारत देशाला परदेशी चलनातुन कोटयावधी रूपये मिळवून दिले होते, असा साखर परिसस्पर्श असलेला ज्ञानी महापुरूष पुन्हा होणे नाही असे म्हणत समस्त वारक-यांनी त्यांच्या कार्याला नतमस्तक होत श्रध्दांजली वाहिली.
