सहकार क्षेत्राला “संजीवनी” देणारा सहकार महर्षी हरपला:- मंत्री छगन भुजबळ…

Uncategorized

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):-
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राला “संजीवनी” देणारा सहकार महर्षी हरपल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
शोक संदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील येसगांव सारख्या छोट्याशा खेडेगावातून ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत कोल्हे यांनी धाडसानं सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे प्रतिनिधीत्व केले.कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरवातीच्या काळापासून काम केले. कोल्हे यांचे सहकारातील योगदान अतिशय मोठे आहे. सन १९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.
माजी मंत्री कोल्हे यांनी शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सहा वेळा ते कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी. एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठे काम केले. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला. त्यांच्या निधनाने सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय कोल्हे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *