
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):-
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात यावी अशी असंख्य साई भक्तांची मागणी लक्षात घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करून रविवार (दि.१३) रोजी आयोजित करण्यात आलेल्या साई परिक्रमाच्या मुहूर्तावर सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते तसेच खा. सदाशिव लोखंडे, विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. एकनाथ गोंदकर, अॅड. सुहास आहेर, महेंद्र शेळके,सचिन गुजर, अविनाश दंडवते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांच्या उपस्थितीत साई मंदिराच्या सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची असंख्य श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांच्या भक्तांची मागणी पूर्ण झाली असून त्यांनी विश्वस्त मंडळाचे आभार मानले आहे.
ज्यावेळी ह.भ.प. गंगागिरी महाराज शिर्डीत आले त्यावेळी त्यांनी साईबाबांना पाहताच हे रत्न इकडे कसे असे उदगार काढून साईबाबांना जीव लावा शिर्डी समृद्ध होईल असे त्यावेळी शिर्डी ग्रामस्थांना सांगितल्याचे साई चरित्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच श्री उपासनी महाराज हे साईबाबांचे शिष्य होते. साईबाबांच्या आदेशानुसार श्री उपासनी महाराजांनी तपश्चर्या केली आहे. याचा देखील उल्लेख आहे.
त्यामुळे शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्यावतीने रविवार (दि.१३) रोजी साई परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. या साई परिक्रमेसाठी साधु संत, असंख्य भक्त व शिर्डी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे हे देखील साई परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते. अशा ऐतिहासिक साई परिक्रमेचे औचित्य साधत श्री साईबाबांच्या मंदिरातील सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात आली. त्याचबरोबर साईबाबांचे समकालीन असलेले साई भक्त कै. श्री वामन माणकोजी पा. गोंदकर व कै. श्री लक्ष्मणराव (मामा) रत्नपारखी यांच्या देखील प्रतिमा लावण्यात आल्या. त्यामुळे साईभक्तांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे.
