कोविड-19 तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे उपाय योजनांचा जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..!!

कोपरगाव

नागरिकांचे प्रबोधन करुन शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे
जिल्हाधिकारी यांचे निर्देश..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- को‍विड-19 च्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर तालुका प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाय योजनांचा आढावा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज संगमनेर येथे घेतला. डॉ.भोसले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संगमनेर येथील पंचायत समिती सभागृहात संगमनेर, पारनेर आणि अकोले तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्‍यात आली होती.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक, गट विकास अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी तीन्ही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्‍य यंत्रणा यांच्‍या कामकाजा संदर्भात माहिती घेऊन तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवून ते शंभर टक्के करण्याचे निर्देश दिले. यासाठी तालुक्यातील विविध यंत्रणांनी समन्वय ठेवून गावनिहाय लसीकरण करण्यासाठी यादी तयार करण्याचे तसेच नागरिकांचे प्रबोधन करुन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासाठभ्‍ सूक्ष्म नियोजन करुन सर्व आस्थापनांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण् करण्याबरोबर कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, लसीकरण वाढविण्‍यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्‍यावे. जास्‍तीत-जास्‍त लसीकरण व चाचण्‍या कशा होतील याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
लसीकरण व कोविड चाचण्‍या वाढविण्‍यासाठी आवश्यक निर्बंध लावण्‍याची सूचना करतानाच ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित आहेत याची खात्री करणे, कोविड सेंटरमध्‍ये स्‍वच्‍छता, गरम पाणी सुविधा, लाईट, ऑक्सिजन बेडची व्‍यवस्‍था आणि आय.सी.यु. कक्षाची व्‍यवस्‍था तसेच प्राथमिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे सूचित केले. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण यावर सुध्‍दा लक्ष केंद्रित करुन लसीकरणाचा वेग वाढविण्‍याकडे लक्ष द्यावे, वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्‍यात उपलब्‍ध असलेल्या बेडची संख्‍या, कोविड रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या नागरीकांची चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या. तसेच कोविड प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना पोलीस विभागासह संबधित विभागांनी करण्याचेही बैठकीत सूचित करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *