कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील आठवड्यात काकडी विमानतळावरून सुरु झालेल्या विमानसेवेमध्ये अडथळे येत असून दृश्यमानता कमी असल्यामुळे विमानांना उतरण्यास अडचणी येत आहे. काकडी विमानतळावर उतरणारे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले होते. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. याची विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन काकडी विमानतळावर विविध कंपनीच्या विमानांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विमानसेवा सुरळीत करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे येण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे काकडीसह पंचक्रोशीच्या गावातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मात्र विमान प्राधिकरणाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे काकडी विमानतळ समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच विमान प्राधिकरण व विविध विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत काकडी विमानतळ येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. काकडी विमानतळासाठी काकडी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या जमिनी विमान प्राधिकरणाला दिल्या आहेत. विमानसेवा ठप्प झाल्यानंतर त्याचा परिणाम विमानतळ परिसरातील गावांमध्ये होतो याची जाणीव ठेवा. विमानतळावरून पूर्णक्षमतेने दिवसा व रात्री विमानसेवा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्या. विमानसेवेला आज ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी लॉकडाऊनच्या काळात या अडचणी का सोडविल्या नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करून विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अडचणी सोडवू व केंद्र शासनाच्या सबंधित अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात आली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उतरली कळा लागली असून येणारा दिवाळी सण, त्यांनतर नाताळ व नवीन वर्ष लक्षात घेता जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये विमानाने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. याची दखल घेऊन या प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा कशा मिळतील याकडे प्राधान्याने लक्ष द्या. कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करा. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देवून कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन द्या.मल्हारवाडी ग्रामस्थांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्या. तसेच कराराप्रमाणे जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूलचे रखडलेले काम पूर्ण करून कार्गो टर्मिनल आराखडा तातडीने तयार करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीसाठी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव, विमानतळ टर्मिनल मॅनेजर एस.मुरली कृष्ण, विमानतळ अभियंता कौस्तुभ ससाणे तसेच विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच इंडिगो एअरलाईन्सचे चौरे, स्पाइस जेट एअरलाईन्सचे स्टेशन मास्तर अशोक मौर्या, राजपथ इंफ्राचे विपुल बावचर आदी अधिकारी उपस्थित होते.
चौकट :- कोरोनाला हरवून परतलेल्या आ.आशुतोष काळे यांचे काकडी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. काकडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत असतांना ग्रामस्थांनी त्यांच्या भोवती गर्दी करून आपल्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी त्याच ठिकाणी जमिनीवर बसून काकडी ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या देखील सोडविण्याच्या सूचना त्यांनी विमान प्राधिकरणाला दिल्या.

फोटो ओळ:-१) काकडी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ. आशुतोष काळे.

फोटो ओळ:- २) काकडी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतांना आ. आशुतोष काळे.
