
कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आय-टू-ई (इन्होवेशन टू एंटरप्राईज) स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव उपस्थित विद्यार्थी स्पर्धकांना संबोधित करतांना म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमाबरोबरच आपल्यातील संशोधन क्षमता ओळखून त्यास वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये (स्टार्टअप अँड इन्होवेशन) मोठया संख्येने सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. कारण आज जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.” कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विज्ञान शाखा प्रमुख डॉ. बी. बी. भोसले म्हणाले की, आजचा विद्यार्थी परीक्षा केंद्री बनत चालला आहे. तसे न करता विद्यार्थ्यांनी शिकता शिकता संशोधनाकडे वळले पाहिजे. उच्च शिक्षणात संशोधनाशिवाय तरणोपाय नाही. विद्याथ्र्यांनी शोधनिबंध लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसा आणि सक्षम प्राध्यापक वृंद येथे उपलब्ध आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले कलाशाखा प्रमुख प्रो. डॉ. के. एल. गिरमकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले. या समारंभात प्रारंभी प्रो. डॉ. एस. आर. पगारे, स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलचे प्रमुख यांनी प्रास्ताविकात स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलेचे माहिती देत स्पर्धेत सभागी संघाचे मनोबल उंचवण्यात मदत केली. स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलचे समन्वयक डॉ. एस. जी. कॉडा यांनी या सेलच्या अंतर्गत गेल्या दोन शेक्षणिक वर्षातील उपक्रमांचा विस्तृत अहवाल सादर केला. त्याच बरोबर चालू शे. वर्षात होणाऱ्या आय-टू-ई (i-2-0) महाविद्यालयीन स्पर्धेचे नियम व थीमची माहिती दिली.
या स्पर्धेमध्ये एकूण १२ संघांनी आपापले संशोधन प्रकल्प सादर केले. त्यातून सर्वोत्कृष्ट २ प्रकल्पांची निवड करून विद्यापीठात पाठविण्यात आले. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद दिसून आला. स्पर्धेत सादर प्रोजेक्ट प्राधान्याने व्यावसायाभिमुख होते ही आणखी उल्लेखनिय बाब होय. या स्पर्धेला आय. क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. व्ही. सी. ठाणगे यांनी शुभेच्छा दिल्या तर कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांचे बहुमुल्य प्रशासकीय सहकार्य लाभले. स्पर्धा संपन्न करण्यासाठी डॉ. जी. के. चव्हाण व प्रा. पी. जी. गुडघे यांचे सहकार्य लाभले. उद्घाटन सत्राचे सूत्र संचालन प्रा. एन. एस. पोटे यांनी केले तर प्रा. ए. डी. पवार यांनी उस्थितांचे आभार मानले.
सहभागी सर्व विद्याथ्र्यांचे कौतुक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीवदादा कुलकर्णी व संचालक श्री. संदीप रोहमारे यांनी केले.
