लखीमपुरच्या घटनेतील आरोपींना कठोर शासन करा; कोपरगावात व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला केंद्र सरकारचा निषेध…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर मध्ये शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (बळीराजाला) केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले असून यामध्ये चार शेतकऱ्यांसह इतरही चार नागरिक असे एकूण आठ नागरिक मारले गेले असून जगाच्या पोशिंद्याला अशा प्रकारे ठार मारण्याच्या अमानुष्य घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सोमवार (दि.११) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु कोपरगाव शहरात बंद न पाळता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला असून कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देवून या घटनेतील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी बोलतांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, राज्यात आमचे सरकार असतांना देखील आम्हाला बंद पुकारावा लागतो यावरून केंद्रातील भाजप सरकारचा किती अतिरेक सुरु आहे याची कल्पना येते. जे सरकार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारते व जे शेतकरी मागील एक वर्षापासून दिल्ली येथे कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला येत नाही यावरून भाजप सरकार किती अहंकारी झाले आहे हे दिसून येत आहे. पेट्रोल, डीझेलचे दर गगनाला भिडले असून सुरुवातीला व्यापारी पद्धतीने उज्ज्वला गॅस योजना सुरु करून घरगुती गॅस सिलेंडरचे दर १ हजार रुपयाच्या पुढे गेले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र बंदची करण्यात आली असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे व देशभरातील जनतेच्या रेट्यामुळे या घटनेतील गुन्हेगार मंत्री पुत्राला उशिरा अटक करण्यात आली मात्र केंद्र सरकारने या मंत्र्याचा अद्यापही राजीनामा घेतलेला नाही याचा निषेध करत आहे. यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, अशी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर विरोधी पक्षाने सरकारवर बोट ठेवून निदर्शन आंदोलन केले असते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एवढी मोठी घटना घडून देखील या घटनेतील गुन्हेगार असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरून या प्रकरणाला धर्माचा रंग भाजप सरकार देत असल्याचे चुकीचे असून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधातील लढाई असून या लढाईत कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला त्याबद्दल आभार मानले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की, कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेला बंद यशस्वी झाला असून लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेचा व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केलेल्या घटनेचा निषेध करीत असल्याचे सांगितले. या प्रसंगी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलवींदरसिंग डडियाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, राहुल देवळालीकर, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, वाल्मीक लहिरे, सुनील तिवारी, अस्लम शेख, इरफान शेख, बाबुराव पवार आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- लखीमपुर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करावे अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *