
कोपरगाव प्रतिनिधी:- कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना कोविडविषयक नियम घालुन दिले आहेत. त्या नियमांचे पालन होत असतांनाच कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत कांदा लिलाव सुरू असतांना बाजारभाव ऐकणा-यांची गर्दी कमी करण्यासाठी लिलाव पुकाराणा-या कर्मचा-याजवळ मायक्रोफोन स्पिकर देण्यात आला आहे. या स्पिकरमुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात प्रत्येक वाहनधारक व कांदा विक्रेता शेतकऱ्यांस आपल्या वाहनाजवळ बसून बाजारभाव ऐकता येत असल्याने होणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात बाजार समितीला यश आले आहे.
सध्याच्या डिजीटल युगात एक आदर्श डिजीटल व्यवस्था बाजार समितीकडे आहे. कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे.बाजार समितीचा आत्मा असलेल्या शेतक-यांना समितीच्या वतीने पिण्याचे शुध्द पाणी, शेतकरी निवास,मानसन्मान आणि इतर सुविधांवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर बाजार समितीच्या सर्व घटकांना सुचना, नियम आदी ऐकवण्यासाठी संपुर्ण बाजार आवारात ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत या लाऊडस्पीकरव्दारे कोरोना विषयक नियमांची जागृती केली जात आहे. मात्र बाजार आवारात लिलाव सुरू असतांना काय भाव निघतो व कोणाच्या कांद्याला काय भाव मिळतो यासाठी सुरू असलेल्या लिलावात शेतकरी गर्दी करतात, ही गर्दी टाळण्यासाठी येथील बाजार समितीने थेट शेतक-यांना त्यांच्या वाहनाजवळ बसून काय बाजारभाव चालु आहे हे ऐकण्यासाठी कांदा पुकारणा-या कर्मचा-याला मायक्रोफोन स्पीकर (माईक) देण्यात आला आहे.
बाजार आवारात लिलाव सुरू होताच बाजारभाव काय निघतो यासाठी शेतक-यांची मोठया प्रमाणात गर्दी होते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मायक्रोफोन स्पिकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लिलावात होणा-या गर्दीचे प्रमाण कमी होणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजीराव शंकरराव रक्ताटे, उपसभापती राजेंद्र शंकरराव निकोले, सचिव नानासाहेब सोपान रणशुर व सर्व संचालक मंडळ यांनी दिली आहे.
