
कोपरगाव प्रतिनिधी:- सबका मालिक एक या महामंत्राद्वारे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे विश्वसंत साईनाथ महाराज यांनी दिलेले “श्रद्धा-सबुरी” चे अलंकार आजच्या कोविड संसर्ग काळात तारकमंत्र ठरले आहे असे प्रतिपादन साईकथाकार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी केले. राहाता तालुक्यातील शिर्डी येथील ‘सबका मालिक एक’ प्रतिष्ठान शिर्डी आयोजित सईआश्रया परिवारात सुरू असलेल्या साईकथेचे पाचवे पुष्प गुंफताना ह.भ.प.सुरासे महाराज बोलत होते , ते पुढे म्हणाले की श्रद्धा जर द्रुढ असेल तर त्याला धैर्याची म्हणजेच सबुरीची जोड असेल तर जीवनात कितीही संकटे आली तरी मनस्थिती ढळु शकत नाही यासाठी साईबाबांचे विचारांचा प्रसार करणे गरजेचे आहे. या कोविड काळात सर्वच क्षेत्रातील जनतेवर आज प्रतिकुलतेचे सावट असुन प्रत्येकाला मानसिक आधाराची गरज वाटत आहे. शिर्डी येथील साईआश्रया परिवारात जवळ जवळ १७० अनाथांना आश्रय मिळाला असुन या परिवारात देखिल साईचरित्र पारायण व साईकथेच्या माध्यमातून साईबाबांच्या विचारांना उजळणी देण्याचे कार्य घडून येते. यामुळे या परिवारातील चिमुरड्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यास नक्की मदत होईल असेहि ते यावेळी बोलताना म्हणाले, याप्रसंगी साईआश्रया परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी दळवी यांनी आश्रयाच्या कार्याची माहिती दिली. या साईकथेस सेवाव्रुत्तीने सहकार्य करणारे तबलावादक संतोष दिक्षीत, वैभव थोरात, राहुल सोनवणे, अमोल कोटमे, गायनाचार्य माउली महाराज चाळक, यांनी सहकार्य केले . तसेच या कार्यक्रमात आश्रमातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दररोज गायन, नुत्य, अभिनय, सादर करण्यात आले. कोविडमुळे हा कार्यक्रम मर्यादित असल्याने बाहेरिल कुणालाही परवानगी नसल्याने ‘साईआश्रया’ च्या यु ट्यूब चँनेलवरुन याचे थेट प्रक्षेपण करण्यात येते याचा घरबसल्या लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गणेशजी दळवी यांनी केले आहे.
